Pune News : कागदी पुठ्ठे गोळा करणार्‍यांवर दारूच्या नशेत सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कागदी पुठ्ठे गोळा करणाऱ्यांवर एकाने दारूच्या नशेत सपासप वारकरत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याप्रकरणी अशोक काळूराम ताठे (वय 50, खांदवेनगर, लोहगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत गणेश चौधरी (वय 32) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश आणि अशोक हे एकाच भागात राहणारे असून, एकमेकांना ओळखतात देखील. अशोक हा एका कंपनीत काम करतो. तर गणेश हे कागदी पुठ्ठे गोळा करतात. दरम्यान ते अशोक काम करत असलेल्या कंपनीतून पुठ्ठे गोळा करत असे. याचा राग अशोकच्या मनात होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी गणेश हे येथील मिल्ट्री टॉवरजवळ थांबले होते. यावेळी आरोपी दारूच्या नशेत तेथे आला. तसेच त्याने शिवीगाळ करत भांडण सुरू केले आणि त्यांना लथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर धारधार चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी पसार झाला. माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा शोध घेऊन अशोक याला अटक केली. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.