Pune News : कालव्यातील दुर्गंधी नागरिकांच्या आरोग्याचा कर्दनकाळ; कालवा स्वच्छ केला नाही, तर अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंढवा जॅकवेलमधून खुटबावपर्यंतच्या शेतीसाठीच्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, नदीतील दुर्गंधीयुक्त पाणी कालव्याद्वारे नेले जात आहे. त्यामुळे कालव्यामध्ये जलपर्णी, राडारोडा आणि गवतामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा ठरत आहे. ठिकठिकाणी कालवा पाझरत असून, कालव्यालगत पाणी साचले असून, डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कालव्यालगतच्या नागरिकांना साथीच्या आजाराचा त्रास सहन करावा लागत आहे. पाटबंधारे विभागाने कालव्याची स्वच्छता तातडीने करावी. अन्यथा पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

मुंढवा जॅकवेलपासून साडेसतरानळी ते खुटबावपर्यंत कालव्याद्वारे पाणी शेतीसाठी दिले जात आहे. शेतीसाठी वरदान ठरलेला बेबी कालवा आता नागरिकांच्या आरोग्याचा कर्दनकाळ बनू पाहात आहे. कालव्यालगतच्या काही सोसायट्यांचे सांडपाणीही त्यामध्ये सोडले आहे. त्याबरोबर मेलेली कुत्री, डुकरे वाहत जात असून, कालव्यात जलपर्णी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कालव्याच्या भरावापर्यंत अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्या अतिक्रमणावरही पाटबंधारे विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे. अतिक्रमणाविषयी स्थानिक नागरिकांनी तक्रार केली, तर तक्रारदारांचे नाव अतिक्रमण कऱणाऱ्यांना अधिकारी-कर्मचारी सांगतात, त्यामुळे कोणी तक्रारही करण्यास धजावत नाहीत. संबंधित अधिकारी आणि अतिक्रमणधारकांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत की काय, अशी चर्चा नागरिकांमध्ये आता सुरू आहे.

कोरोनाच्या भीतीने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. आता कुठे कोरोनातून नागरिक बाहेर पडत आहेत. मात्र, डास-मच्छरांमुळे नागरिकांना साथीच्या आजाराचे बळी पडतो की काय, अशी शंका वाटू लागली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी बेबी कालव्याची तातडीने स्वच्छता करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

कालव्यावरील रस्त्यावर ठिकठिकाणी हातगाड्या, गॅरेज, दुकाने, खाद्यपदार्थ विक्रेत्यांची रेलचेल झाली आहे. मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कालव्याच्या भराव स्वच्छ करून रस्ते केले आहेत. मात्र, त्या ठिकाणीही अनेकांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे कालव्यावरील रस्त्यावरही वाहतूककोंडी होऊन अपघातसदृशस्थिती निर्माण झाली आहे. तरीसुद्धा पाटबंधारे खात्यातील अधिकारी-कर्मचारी मूग गिळून गप्पा का बसले आहेत.

अगदी खडकवासलापासून ते महापालिका हद्द संपेपर्यंतच्या कालव्यावर ठिकठिकाणी अतिक्रमणे नाही, तर हडपसर – शिंदेवस्तीमधील कालवाच बुजवून तेथे घरे बांधली आहेत. रस्ता तयार केला आहे, तरीसुद्धा अधिकारी कारवाई करण्याऐवजी बघ्याची भूमिका का घेत आहेत, याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे.