Pune News : न्यायाधीश ‘मॅनेज’ करून निकाल बाजूने लावण्यासाठी घेतलेल्या लाच प्रकरणात महिलेला जामीन; खटला रद्द करण्यासाठी स्विकारली होती लाच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फौजदारी खटला न्यायाधीशांना मॅनेज करून रद्द करण्यासाठी ५० हजार रुपये लाच स्वीकारल्या प्रकरणात एका महिला न्यायाधीशांचा हात असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या तपासातून निष्पन्न झाले आहे. वडगाव मावळ न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना दीपक जतकर यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुढे आले आहे.

शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय २९, रा. तळेगाव) या महिलेने ही लाच स्वीकारली होती. तिला १३ जानेवारी रोजी किवळे येथे लाच स्वीकारताना अटक झाली होती. याबाबत वडगाव मावळ तालुक्‍यातील इंदुरी येथील ३२ वर्षीय व्यक्तीने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कडजई माता दूध संकलन मंडळाचे अध्यक्ष आहेत. दूध संकलन करून एका डेअरीला घालण्यात येत असत. त्या डेअरी चालकांनी फिर्यादी आणि भावाच्या विरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे. या गुन्ह्यात तुम्हाला आणि भावाला अटक होणार आहे. ही केस रद्द करण्यासाठी न्यायाधीश मॅनेज करण्याच्या नावाखाली गायकवाड हिने अडीच लाख रुपयांची लाच मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी गायकवाड हिला १४ जानेवारी रोजी अटक केली होती. या गुन्ह्यात जामीन मिळावा म्हणून गायकवाड हिने ॲड. सुधीर शहा, ॲड. सुहास कोल्हे आणि ॲड. राहुल भरेकर यांच्यामार्फत अर्ज केला होता. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी तिची २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर सुटका केली. गायकवाड हिच्या जामीन अर्जास विरोध करताना न्यायालयात सादर केलेल्या रिपोर्टमध्ये या गुन्ह्यात न्यायाधीशांचा सहभाग असल्याचे नमूद आहे.

न्यायाधीशांना अटकपुर्व जामीनासाठी अर्ज:
या गुन्ह्यात नाव आल्याने न्यायाधीशांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांनी केलेल्या अटकपूर्व जामिनाच्या मुख्य अर्जावर २२ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. न्यायाधीशांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अटक करण्यास परवानगी मिळण्याचा अर्ज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा न्यायाधीशांकडे अर्ज केला आहे. मात्र त्यांनी हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे पाठवले आहे. हा अर्ज सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.