Pune News : विक्रीनंतरची सेवा न पुरविणार्‍या संगणक विक्रेत्याला ग्राहक आयोगाचा दणका; लॅपटॉप दुरुस्तीचे पैसे परत द्यावे लागणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ग्राहकाला लॅपटॉप विकल्यानंतर दुरुस्ती कराराप्रमाणे ठरलेल्या सुविधा न पुरविणा-या संगणक व्यावसायिकाला पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. तक्रारदाराने लॅपटॉप दुरुस्तीसाठी भरलेले 13 हजार 183 नऊ टक्के व्याजाने परत करावे लागणार आहे. तसेच मानसिक त्रासापोटी, तक्रारीच्या खर्चापोटी एकत्रित 25 हजार रुपये द्यावे, असा आदेश आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य क्षितिज कुलकर्णी यांनी दिला आहे.

या प्रकरणात किरण कुंभार यांनी मायक्रोन कॉम्पुटर विरुद्ध ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. कुंभार यांनी मायक्रोन कॉम्पुटर येथून 30 हजार 990 रुपयांचा लॅपटॉप 19 जून 2014 रोजी खरेदी केला होता. लॅपटॉप वापरत असताना त्यांना त्यात काही दोष असल्याचे समजले. त्यावेळी लॅपटॉप दुसरुस्तुसाठी दिला असता मदर बोर्डमध्ये खराबी असल्याचे सांगण्यात आले. नोव्हेंबर 2017 मध्ये त्यांनी तो दुरुस्त करून घेतला. त्यानंतर लॅपटॉप सुरू केला असता बॅटरीमध्ये दोष असल्याचे कुंभार यांच्या लक्षात आले. त्यावेळी मायक्रोनने लॅपटॉपची बॅटरी बदलून दिली. त्यासाठी 3 हजार 540 रुपये घेतले. त्यानंतरही लॅपटॉप व्यवस्थित सुरू न झाल्याने कुंभार यांनी लॅपटॉप कंपनीच्या अधिकृत सेंटरमध्ये तो दुरुस्तीसाठी दिला. मदर बोर्ड दुरुस्तीमध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे लॅपटॉप वारंवार नादुरुस्त होत असल्याचे त्यांना सेंटरमध्ये सांगण्यात आले. याकाळात लॅपटॉप दुरुस्तीसाठी एकूण 13 हजार 183 रुपये खर्च आला होता. त्यामुळे कुंभार यांनी ग्राहक आयोगात धाव घेत तक्रार दाखल केली. दुरुस्तीसाठी भरलेली रक्कम, मानसिक त्रासापोटी, तक्रारीच्या खर्चापोटी नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली होती. मंचाची नोटीस पाठवून देखील मायक्रॉन कंपनीने म्हणणे दाखल न केल्यामुळे मंचाने एकतर्फी आदेश दिला. त्यावेळी जाबदेणार यांनी तक्रारदाराला लॅपटॉप विक्री पश्‍चात दुरुस्ती कराराप्रमाणे सेवा पुरविण्यात कसूर केला आहे, असे मंचाने आदेशात नमूद करत नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.