Pune News : दागिने परत करण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला, नगर विभागाचे सह संचालक नाझिरकर यांच्या पत्नीनं केला होता अर्ज

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – स्त्रीधन असलेले 945 ग्रॅम सोने तर 12 हजार 365 ग्रॅम चांदीचे दागिने परत करण्याची मागणी करणारा संगीता नाझिरकर यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. संगीता या अमरावती नगर रचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझिरकर यांच्या पत्नी आहेत. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला.

बेहिशोबी मालमत्ता बाळगल्या प्रकरणात हनुमंत नाझिरकर (वय 53) यांच्यासह त्यांच्या पत्नी संगीता नाझिरकर, मुलगा भास्कर नाझिरकर व मुलगी गीतांजली नाझिरकर (रा. स्वप्नशिल्प हौसिंग सोसायटी, कोथरूड) अशा चौघांविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या घरी घातलेल्या छाप्यात उत्पन्नापेक्षा दोन कोटी 75 लाख रुपयांची जादा रक्कम व मालमत्ता त्यांच्याकडे आढळली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे यांनी फिर्याद दिली आहे. नाझिरकर यांनी केलेल्या अर्जास सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला.

नाझिरकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे बेहिशोबी मालमत्ता असल्याचे निष्पन्न होत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाअंती स्पष्ट केले आहे. संगीता नाझिरकर यांच्या वैवाहिक जीवनापुर्वीची पार्श्वभूमी पाहता त्यांना वडिलांकडून लग्नाच्या वेळी एवढ्या किमतीचे व वजनाचे दागिने स्त्री धन म्हणून दिले हे संशयास्पद असून याबाबत तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेले दागिने संगीता यांना परत केल्यास ते त्याची विक्री करून पुरावा नष्ट करण्याची शक्‍यता असल्याचा युक्तिवाद ऍड. अगरवाल यांनी केला.

स्त्रीधन असल्याचा पुरावा सादर केला नाही :
जप्त करण्यात आलेले दागिने हे खरेदी करण्यात आलेले आहे तसेच ते स्त्रीधन असल्याचा पुरावा सादर न केल्याने अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले. जप्त करण्यात आलेले दागिने हनुमंत नाझिरकर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून खरेदी केले आहेत का याबाबतचा तपास सुरू आहे, असेही ऍड. अगरवाल यांनी न्यायालयास सांगितले.