Pune News : मोक्का लावल्याच्या रागातून मध्यरात्री वानवडी परिसरात टोळक्याकडून 10 ते 12 वाहनांची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात दोन गटातील वाद आणि वर्चस्व राखण्यासाठी टोळक्याकडून वाहनांचे खळखट्याक केले जात आहे. पण चक्क पोलिसांनी टोळीवर मोक्का लावल्याचा रागातून मध्यरात्री वानवडी येथे टोळक्याने वाहनांची तोडफोड करत तुफान दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे एकीकडे वर्चस्व वाद असताना आता पोलिसांच्या कारवाईला देखील टोळके तोडफोड करत विरोध दर्शवत असल्याचे दिसत आहे. यात 10 ते 12 वाहनांची तोडफोड केली आहे.

याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वानवडी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार गिरीश उर्फ सनी हिवळे याच्या टोळीवर मोक्का लावला. त्यात दोन तरुणीचा सहभाग असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्यावरून गुन्हा दाखल होता. त्याप्रकरणात हा मोक्का लावला आहे. यामुळे वानवडीत सर्व सामान्य खुश झाले. पण टोळीचे चाहते मात्र खुश नसल्याचे दिसत आहे.

अचानक मध्यरात्री काही तरुणाचे टोळके महंमदवाडी परिसरात आले. त्यांनी तुफान गोंधळ घालत आणि हातात हत्यारे घेऊन राडा घातला. तर पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड करत दहशत माजवली. काही काळ चाललेल्या गोंधळामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. ही माहिती मिळताच वानवडी पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केल्यानंतर जवळपास 10 ते 12 वाहनांची तोडफोड झाली आहे. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही तोडफोड पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केल्याच्या रागातून झाली असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्याबाबत तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.