Pune News : फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावच्या टीपी स्कीमवर 6 जानेवारीपासून नागरिकांशी चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फुरसुंगी आणि उरुळी देवाची प्रारूप नगर रचना अर्थात टी पी स्कीम चा कच्चा मसुदा तयार करण्यात आला आहे. यावर स्थानिक नागरिकांशी चर्चा करण्याचे वेळापत्रक महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

या वेळापत्रकानुसार फुरसुंगी येथील नागरिकांशी 6 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान सकाळी 10 ते 6 वाजेदरम्यान फुरसुंगी ग्रामपंचायत कार्यालय येथे चर्चा करण्यात येणार आहे. तर 1 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेदरम्यान उरुळी देवाची येथील सोनाई गार्डन मध्ये ही चर्चा होणार आहे. संबंधितांनी वरील कालावधीत आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहून लेखी स्वरूपात आपले म्हणने मांडावे. यानंतर आवश्यक वाटल्यास योग्य ते फेरबदल करून महापालिका पुढील कार्यवाही करेल, असे आवाहन पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी केले आहे.

महापालिकेमध्ये 11 गावांचा समावेश झाला त्यामध्ये फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे आहेत. 1 मार्च 2019 मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने या दोन गावांमध्ये टीपी स्कीम द्वारे या दोन्ही गावांचा नियोजनबद्ध विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महापालिका स्तरावर या दोन्ही गावांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आरखड्यानुसार कच्चा मसुदा तयार करण्यात आला असून यावर स्थानिक नागरिकांच्या हरकती मागविल्या जाणार आहेत.