Pune News : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकार्‍यावर खंडणीचा FIR दाखल,एक लाख घेताना एजंटला अटक

पिंपरी : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकार्‍यांनेच इतरांना हाताशी धरुन २० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीतील कन्सल्टंटकडून माहिती घेऊन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करुन ती तक्रार मागे घेण्यासाठी २० लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे वाकडेवाडी येथील विभागीय अधिकारी डॉ. जितेंद्र संघेवार आणि कन्सल्टंट आशिष अरबाळे तसेच  पंढरीनाथ साबळे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एक लाखांची खंडणी घेताना कैलास नरके याला रंगेहाथ पकडले आहे.

याप्रकरणी स्टार इंजिनियर्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कपील पाटील (वय ४२) यांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. चिंचवडमधील एमआयडीसीमध्ये स्टार इंजिनियर्स इंडिया ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये कन्सल्टंट म्हणून आशिष अरबाळे हे काम करतात. त्यांनी कंपनीविषयी पंढरीनाथ साबळे यांना माहिती दिली. साबळे यांनी दिलेल्या माहितीवरुन कैलास नरके याने कंपनीविरुद्ध महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रार दिली.  तेथील विभागीय अधिकारी डॉ. जितेंद्र संघेवार यांनी या तक्रारीवरुन इतरांशी संगनमत करुन तक्रार मागे घेण्यासाठी कैलास नरके (रा. तळेगाव ढमढेरे) याच्यामार्फत कपील पाटील यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. पाटील यांनी पिंपरी पोलिसांकडे त्याची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. खंडणीपैकी पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपयांचे पाकिट घेण्यासाठी पुण्यातील नगर रोडवरील हयात हॉटेलमध्ये कैलास नरके याला सोमवारी रात्री बोलावण्यात आले. तेथे पाटील यांच्याकडून खंडणीतील टोकन म्हणून १ लाख रुपये स्वीकारताना नरके याला पकडण्यात आले.