Pune News : पाटस टोलनाक्यावर सर्वच लेनवर FASTag चा फलक, वाहनचालकांचा गोंधळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-सोलापूर रस्त्यावरील पाटस टोल नाक्यावरील सर्वच लेनवर फास्टॅग असा फलक लावल्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. फास्टॅगचा अर्थ आणि त्याचा वापर कोणी कसा करायचा याची निमयावली जाहीर केली आहे. मात्र, त्यासंबंधीच्या नियमावलीचे पालन पाटस टोलनाक्यावर केले जात नसल्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडत असून, सर्वच लेनवर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. मग फास्टॅग केला तरी कशासाठी असा संतप्त सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

फास्टॅगचा वापर वाढावा, वेळ वाचावा या उद्देशाने महामंडळाने कार, जीप आणि एसयूव्ही वाहनधारकांसाठी मर्यादित कालावधीसाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा पाटस टोलनाक्यावर पुरता फज्जा उडाला आहे. रस्ते विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी पाटस टोल नाक्याची पाहणी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

साखर कारखाने सुरू झाल्यामुळे ऊसाचे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणाहून ये-जा करीत असतात. ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा वेग कमी आणि दोन-दोन ट्रॉल्या जोडलेल्या असतात, त्यामुळे वाहनचालकांची फसगत होते. एक-दोन ट्रॅक्टर पुढे असतील, तर बाजूने रस्ता मिळत नाही, ओव्हरटेक करता येत नाही, त्यामुळे वाहनांच्या रांगा लागून वाहतूककोंडी होते. वाहतूककोंडीमुळे अपघाताची शक्यता वाढली असल्याचे वाहनचालकांनी सांगितले.