Pune News : मराठा तरुणांसाठी ‘सारथी’अंतर्गत मोफत कोर्सेस

पुणे : मराठा समाजातील युवक ‘जॉब रेडी’ व्हावेत या उद्देशाने ‘सारथी’मार्फत (छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे) विशेष कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मराठा, कुणबी समाजाच्या तरुणांना याअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विविध कोर्सेसचा लाभ घेता येणार आहे.

फील्ड टेक्निशियन (संगणक आणि हार्डवेअर), फील्ड टेक्निशियन (नेटवर्किंग आणि स्टोरेज) आणि मोबाइल फोन हार्डवेअर दुरुस्ती तंत्रज्ञ अशी तीन कौशल्य कोर्सेस असून, ती प्रत्येकी दोन महिन्यांची आहेत. त्यासाठी पात्रता अनुक्रमे १२ वी उत्तीर्ण, पदविका उत्तीर्ण, १० वी उत्तीर्ण अशा आहेत. तिन्ही कोर्सेस पूर्णपणे नि:शुल्क आहेत. शिवाय निवड झालेल्या सर्व उमेदवारांना उपस्थिती ९० टक्क्यांवर असल्यास रोज ७५ रुपये भत्ता दिला जाणार असून, या व्यतिरिक्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीबाहेरून येणाऱ्या उमेदवारांना रोज ३०० रुपये निवास भत्ता दिला जाणार आहे, त्यासाठीदेखील ९० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.

मराठा, कुणबी समाजातील पात्रता प्राप्त तरुणांनी या कोर्सेसचा लाभ होऊन स्वयंरोजगार कुशल होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन ‘सारथी’ने केले आहे. अधिक माहितीसाठी १२८९, जंगली महाराज रस्ता, (गंधर्व हॉटेलच्या मागे, हॉटेल स्वान इन समोर शिवाजीनगर, ४११००५), ०२०२५५३०२९१, ९१७५९७४३६८ या ठिकाणी प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन अस्पायरच्या वतीने करण्यात आले आहे.