Pune News : कोथरूडमध्ये पुर्वीच्या केअर टेकरनं ज्येष्ठ दाम्पत्याला शस्त्राचा धाक दाखवत 11 लाखाचा ऐवज लुटका, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कोथरुड परिसरात पूर्वीच्या केअर टेकरने जेष्ठ दांपत्याचे बंगल्यात शिरून त्यांच्या गळ्याला शस्त्र लावत घरातील साडे आकरा लाख रुपयांचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. तर त्यांच्या हातावर वार करून त्यांना जखमी केले आहे. या घटनेनंतर कोथरुड परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात 74 वर्षीय जेष्ठ नागरिकांने फिर्याद दिली आहे त्यानुसार केअर टेकर संदीप व त्याच्या दोन साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार काल मध्यरात्री घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या पत्नी हे दोघेच जय भवानी नगर येथे त्यांच्या बंगल्यात राहतात. त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो, तर विवाहित मुलगी बावधन येथे राहते. दरम्यान त्याच्या देखभालीसाठी ते केअर टेकर ठेवतात. त्यांनी संदीप याला केअर टेकर म्हणून कामास ठेवले होते. काही वर्षे त्याने काम केले. मात्र दीड वर्षांपूर्वी त्याने येथील काम सोडले. त्यामुळे त्याला फिर्यादी यांची व त्यांच्या घराची पूर्ण माहिती होती. दरम्यान काल मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी संदीप व त्याचे दोन साथीदार हे गच्चीवर असलेल्या खिडकीचे गज कापून आत शिरले. त्यांच्याजवळ घातक शस्त्र होती.

आत आल्यानंतर त्यांनी फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्याला कोयता व धारधार शस्त्र लावत “आवज करने का, नहीं” असे म्हणत त्यांना धमकावले. तसेच त्यांच्या हातावर वार करत त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांच्या बेडरूममध्ये असलेल्या कपाटातून रोकड आणि दागिने असा 11 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. यानंतर फिर्यादी हे खूपच घाबरून गेले होते. त्यांनी नातेवाईक आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होत, पाहणी केली. दरम्यान सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा माग काढला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र उच्चभ्रू आणि जेष्ठांचा परिसर असणाऱ्या कोथरुडमध्ये हा प्रकार घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.