Pune News : बेपत्ता, अपहरण की खून ? पुणे पोलीस संभ्रमात; कर्वेनगरच्या तरुणाचे गूढ उकलेना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कर्वेनगर परिसरातून एक तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याच्या तिसऱ्याच दिवशी त्या बेपत्ता तरुणाच्या घरी कुरियर पार्सल आले आणि त्याच्या कुटुंबाची झोप उडाली. कुरियर पार्सलमध्ये त्या तरुणाचा मोबाईल, कागदपत्रे आणि ‘मी त्याला मारले नसते तर त्याने मला मारले असते’ असे लिहीलेली ‘नोट’ आढळली आहे. त्यामुळे पोलीस देखील याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत. पण, अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही. तर पोलीसही तो बेपत्ता झाला, की त्याचे अपहरण आणि खून झाला या संभ्रमात आहेत.

याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. याबाबत अपहरण झालेल्या 29 वर्षीय तरुणाच्या भावाने तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेला तरुण एका ड्रायव्हिंग स्कुलमध्ये काम करतो. दरम्यान, धानोरी येथे राहणाऱ्या एका तरुणांकडे त्याने सेकंड हॅन्ड कारसाठी 9 ते 10 लाख रुपये दिले होते. पण त्याने कार दिल्या नाहीत. तर दिलेले पैसेही परत केले नव्हते. यामुळे त्यांच्यात वाद होते.

दरम्यान, बेपत्ता झालेला तरुण रविवारी एका मेडिकलच्या दुकानात गेला होता. त्यानंतर तो गायब झाला. त्याच्या कुटुंबाने तो न आल्याने रात्री पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मिसिंग दाखल केली. तोपर्यंत या प्रकरणात गंभीर असे काहीच नव्हते. पण तिसऱ्या दिवशी या तरुणाच्या घरी एक कुरियरमधून पार्सल आले. कुटुंबाने ते पाहिले. यावेळी त्यात बेपत्ता झालेल्या तरुणाचा मोबाईल, त्याचे संपूर्ण कागदपत्रे आणि एक नोट आढळून आली. त्या नोटमध्ये ‘आमचे पैसे व्यवहारचे होते. पण, त्यातून वाद झाले. मी त्याला मारले नसते तर त्याने मला मारले असते. त्यामुळे तुम्ही याचा शोध घेऊ नका’ असा उल्लेख केला आहे. कुटुंबाला हा प्रकार समजताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी या बेपत्ता प्रकरणाचे गांभीर्य ओळखत तपासला सुरुवात केली आहे. आता अलंकार पोलीस हे स्टेशनच्या हद्दीच्या परिसरातील सीसीटीव्ही पडताळून पाहत आहेत. तर कुरियर कोठून आले, याचा शोध घेतला असता ते हडपसर येथील एका नामांकित कुरियर कंपनीमधून आले असल्याचे निदर्शनास आले आहे. या कुरियरवर वाद असलेल्या व्यक्तीचे नाव पत्ता आणि मोबाईल क्रमांक आहे.

पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस तो राहत असलेल्या धानोरीत गेले. त्यावेळी तो याठिकाणी भाड्याची खोली घेऊन आईवडिलांसोबत राहत असल्याचे समजले आहे. पण तो देखील शनिवारी आई-वडिलांना घेऊन निघून गेला आहे. त्याची माहिती घेतली असता, तो फ्रॉड होता. त्याला काही दिवसांपूर्वीच घरी येऊन काही व्यक्तींनी पैसे घेतले म्हणून मारहाण केली असल्याचे घर मालकाकडून समजले. त्यामुळे त्यांनी त्याला घर सोडण्यास सांगितले होते. तो मूळचा राजस्थान येथील आहे. आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पण तो सापडत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर त्याच्या नातेवाईकाकडे याबाबत माहिती घेतली जात आहे. अनेकांकडे चौकशी केली आहे. पण अद्याप काही थांगपत्ता लागलेला नाही.

दरम्यान, बेपत्ता झालेला तो तरुण मित्रांसोबत राहत होता. त्यांच्याकडे तपास केल्यानंतर त्यांनी तो नांदेड जिल्ह्यात असलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या संपर्कात असल्याचे समजले आहे. त्या दृष्टीने देखील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पण, पोलिसांनीच सर्व प्रकरणावरून आता तो बेपत्ता झाला की त्याचे अपहरण झाले हे सांगता येत नसल्याचे स्पष्ट केले असून, पोलिसही या प्रकरणात संभ्रमात आहेत.