Pune News : आयटी इंजिनिअरचा मोबाईल हिसकवला; अल्पवयीन ताब्यात, गाडी मालक अडचणीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात अल्पवयीन गुन्हेगारांनी उच्छाद घातला असून, 2 अल्पवयीन मुलांनी शेजाऱ्याची गाडी घेऊन आल्यानंतर एका आयटी इंजिनिअरचा मोबाईल हिसकावून पोबारा केल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी गाडीच्या क्रमांकाचा शोध घेतल्यानंतर त्या अल्पवयीन मुलांना पकडले. पण यात गाडी देणारा मालक अडचणीत आला आहे.

याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात पराग कुलकर्णी (वय 35, रा. रावेत) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका आयटी कंपनीत नोकरीस आहेत. दरम्यान 1 फेब्रुवारी रोजी रात्री साडे आकरा वाजता ते खडकीमधील नवीन बस स्टॅण्डचे समोर येऊन थांबले होते. त्यांना रावेत येथे जायचे होते. त्यांनी उशीर झाल्याने कॅब बुक करण्याचे ठरवले आणि खिशातील मोबाईल काढला.पण त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील 25 हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून नेला. त्यांनी गाडीचा नंबर पाहिला व तो पोलिसांना दिला. यानंतर खडकी पोलिसांनी तपास करत या गाडीच्या मालकाकडे पोहचले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने माझी गाडी या दोन मुलांना काही कामानिमित्त दिली असल्याचे सांगितले. त्यानुसार या दोन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना ताब्यात घेतले. तसेच गुन्हा करतेवेळी वापरलेली गाडी देखील जप्त केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक प्रताप गिरी करत आहेत.