Pune News : मुक्ता दाभोळकर यांना जिजाऊ-रमाई पुरस्कार प्रदान; उल्हास पवार म्हणाले – ‘देशभरात विचारवंतांच्या हत्येचे सत्र सुरूच’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   देशभरामध्ये विचारवंतांच्या हत्येचे जे सत्र सुरू झाले. त्यामध्ये नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश या पाच विचारवंतांचे खुनी अद्यापपर्यंत सापडत नाहीत, ही शोकांतिका आहे, व तपासयंत्रणेचे अपयश आहे. विचारवंतांचे खून या ठराविक विचारसरणीच्या लोकांकडून केले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आता त्या विचारधारेच्या लोकांनी हत्या करण्याचे खून करण्योच मार्ग बदलून विचारवंतांना नक्षलवादी, देशद्रोही, दहशतवादी ठरवून त्यांना बदनाम करून कारागृहात डांबण्याचे प्रकार सुरू केले आहेत. याविरुद्ध लढा देण्याची गरज आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी स्पष्ट केले.

रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने दिला जाणारा जिजाऊ-रमाई समाजभूषण पुरस्कार यंदा मुक्ता दाभोलकर यांना ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, शाल, पिंपळ वृक्षाचे रोप, सन्मानपत्र, गौरवचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते. याप्रसंगी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्ष अ‍ॅड. वैशाली चांदणे, रावसाहेब पटवर्धन महाविद्यालयाच्या प्राचार्या वृंदा हजारे, रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण उपस्थित होते.

अंनिसच्या मुक्ता दाभोलकर म्हणाल्या की, जिजाऊ-सावित्री-रमाई या थोर स्त्रियांनी व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करून आपले सामाजिक कार्याने इतिहासात नोंद केली. परंपरेने लादलेले शोषण, अन्याय, अत्याचार याविरुद्ध त्यांनी सातत्याने संघर्षपूर्ण लढाई उभी केली. त्यामुळे रयतेचे राज्य निर्माण झाले. प्रत्येक स्त्रिला शिक्षण मिळू लागले. यातील सेवाभावी वृत्ती, त्याग, समर्पण, आणि लोकनिष्ठा ठेवल्यानेच येथे परिवर्तन घडल्याचे दिसते. मात्र, सातत्याने सत्तेच्या खुर्च्या मिळत गेल्याने गोर-गरीबांचे, शेतकर्‍यांचे प्रश्‍न अधिकाधिक तीव्र होताना दिसतात. त्यामुळे शोषित, वंचितांसाठी काम करणार्‍या सामाजिक संघटनामध्ये सत्ता बदलाची ताकद आली पाहिजे, असे स्पष्ट केले.

दिपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. केंद्रीय कार्यालय सचिव दीपक पवार, अपर्णा साठे, गिरीष घाग, नम्रता पवार, दिव्या कोंतम, यशस्वीनी नवघणे, उमा नवघणे, गिता साका, मिना शिंदे, सुरेखा कुसाळकर, ज्योति वाघमारे, माऊली जाधव, विकास साठे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.