Pune News : लष्कर पोलीस ठाण्यातील ‘त्या’ पोलिसाचे तडकाफडकी निलंबन, मोदीखान्यातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून केली होती 63 जणांवर कारवाई; जाणून घ्या नेमकं काय झालं होतं ते

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शहरातील सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने कारवाई केल्यानंतर आता ही कारवाई ‘संयुक्त’ दाखवा किंवा त्यात ‘जास्त मोठी’ कारवाई दाखवू नका म्हणणाऱ्या तसेच हद्दीतील ‘अवैध धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून लष्कराच्या पोलीसाचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईने शहरातील ‘कलेक्टरां’चे धाबे दणानले आहेत. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश धर्मा सोनवणे असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

गेल्या आठवड्यात (दि 28 जानेवारी) गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक व युनिट दोनच्या पथकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीवरून लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 मजली इमारतीत दणक्यात सुरू असलेल्या जुगार आड्यावर छापा टाकला. या छापा कारवाईत जवळपास पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज पकडला. तर सर्वाधिक म्हणजे सागर खरे याच्यासह 62 जणांना इमारतीत पकडण्यात आले. ही कारवाई झाल्यानंतर मात्र शहरात एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर ही कारवाई गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तितक्याच दणक्यात केली. पण ‘गंमत’ अशी झाली कारवाईला अधिकारी शिरले आत पण जुगार चालक सागर खरेने इमारतीचा दरवाजा मात्र काही उघडला नाही. अधिकारी हैराण झाले. मग राजेश तिथे आले. त्यांनी आवाज देऊन दरवाजा उघडण्यास सांगितले. त्यानंतर हा दरवाजा लागलीच उघडला आणि कारवाईला सुरुवात झाली.

कारवाई सुरू झाल्यानंतर मात्र, राजेश यांनी ही कारवाई ‘संयुक्त’ म्हणजेच लष्कर पोलीस व गुन्हे शाखेने केली अशी दाखवू, अशी विनंती केली. पण अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहीतीने कारवाई केल्याने रिस्क न घेता थेट आपलीच कारवाई केली. त्यानंतर राजेश यांनी पुन्हा कारवाई जास्त मोठी न दाखवावी यासाठी विनंती केली. पण ती देखील पूर्ण न झाल्याने राजेश हे तेथून निघून गेले.

कारवाईचा दणका उडाल्यानंतर शहरात खळबळ तर उडली.
या कारवाईचा तपास सुरू झाल्यानंतर राजेश यांनी कारवाईसाठी केलेली विनंती आणि त्यांना तिथे जुगार सुरू असल्याचे माहिती असताना देखील याकडे दुर्लक्ष केल्यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजेश सोनवणे यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे. अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी हे आदेश दिले आहेत.