Pune News : मेफेड्रॉन बाळगणार्‍याला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  वडगाव बुद्रूक परिसरात सात लाख 56 हजार रुपयांचा मेफेड्रॉन हा अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला दोन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

महम्मद अब्दुल रहमान इरशाक (वय 23, रा. मुंढवा, मूळ रा. केरळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. इरशाकला बुधवारी (ता.30) वडगाव परिसरातील हॉटेल रॉयल जगदंब समोर असलेल्या रस्त्यावरून ताब्यात घेण्यात आले. इरशाक याच्याकडे मेफेड्रॉन असून तो घटनास्थळी असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची तपासणी केली असता त्याकडे 63 ग्रॅम वजनाचे मेफेड्रान आढळले. त्याकडून मेफेड्रॉन, दुचाकी आणि वजनकाटा असा एकूण आठ लाख 8 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी इरशाक याला न्यायालयात हजर केले असता, त्याने हे ड्रग कोठून आणले, अशा प्रकारे आणखी ड्रगचा साठा केला आहे का?, त्याचे आणखी कोणी साथीदार आहे का?, मेफेड्रॉनची तो कोणाला विक्री करणार होता? याचा तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली.