Pune News : CNG आणि PNG पुरवठ्याद्वारे MNGL चा पर्यावरण गुणवत्ता वाढीवर भर – खा. गिरीष बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत तेलावर आधारित इंधनाकडून गॅसवर आधारित अर्थव्यवस्था तयार करण्याचे ध्येय ठेवले आहे तसेच नैसर्गिक वायूंचा वापर सहा टक्क्यांवरून १५ टक्क्ंयापर्यंत वाढविण्याचे निर्धारित केले आहे. त्यांच्या या दूरदृष्टीला प्रत्यक्ष आणण्याचे आणि पुढे नेण्याचे कार्य पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान करत आहेत. त्यासाठी दिवसेंदिवस शहरातील गॅस वितरण यंत्रणा सक्षम करतानाच ४०२ जिल्ह्यांमध्ये २७ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत ७० टक्के लोकसंख्येला आणि देशाच्या ५३ टक्के भौगोलिक क्षेत्रात याचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यामध्ये पुणे शहर हे नेहमीच पुढे राहिले आहे, विशेषत: पर्यावरणाच्या बाबतीत हे शहर संवेदनशील आहे. ऑटोमोबाईल, घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राला सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा करून एमएनजीएलने पर्यावरणची गुणवत्ता वाढविण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे, असे मत खासदार गिरीष बापट यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या १६ स्थापनादिनानिमित्त मागील १५ वर्षांतील एमएनजीएलच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी बापट बोलत होते. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुप्रियो हल्दर, स्वतंत्र संचालक राजेश पांडे, वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के, माणिक कदम, सुजीत रुईकर, अविनाश त्रिपाठी, मयुरेश गानू, सागर वर्मा, अमोल हट्टी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गिरीश बापट म्हणाले, विकासाचा हा प्रवास पुढे सुरू ठेवण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासन, पीएमसी व पीसीएमसीचे आयुक्त, पोलिस व अन्य अधिकाºयांशी चर्चा केली. परिणामस्वरूप एकूण ९५ टक्के परवानग्यांना पुन्हा कायदेशीर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे काही कामांना परवानगी मिळाली आहे तर पीएमसी व पीसीएमसीमधील काही कामांना लवकरच परवानगी मिळू शकणार आहे.

सुप्रियो हल्दर म्हणाले, एमएनजीएलने आपल्या प्रवासाला २००६ मध्ये केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पालकत्वाखाली सुरूवात केली होती. भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियमन महामंडळाकडून (पीएनजीआरबी) एमएनजीएलला पुढील भौगोलिक परिसरांमध्ये गॅस वितरण प्रकल्प सुरू करण्यासाठी यंत्रणेचा पाया घालणे, बांधकाम, यंत्रणा कार्यान्वित करणे (ऑपरेशन) आणि विस्तार यासाठी प्राधिकृत करण्यात आले होते. महाराष्ट्रातील पुणे शहर आणि त्याला चाकणसह जोडलेला परिसर, तळेगाव, हिंजवडी, नाशिक, धुळे आणि सिंधुदुर्ग जिल्हे, कर्नाटकातील रामनगर जिल्हा आणि गुजराथच्या वलसाडचा काही भागाचा यामध्ये समावेश आहे. संपूर्णत: पर्यावरणपूरक इंधनाचे एकमेव वितरक म्हणून एमएनजीएलने आपल्या ध्येयाशी कटिबद्ध राहात स्वच्छ व पर्यावरणपूरक हरित इंधन- सीएनजीचा पर्याय, पेट्रोल, डिझेलसारख्या पारंपरिक इंधनाला उपलब्ध करून दिला आहे.

राजेश पांडे म्हणाले, एमएनजीएलने सीएनजीचे मोबाईल रिफ्युलिंग युनिट सुरू करण्यासाठीही पुढाकार घेतला असून अशाप्रकारचा हा भारतातील पहिलाच प्रयत्न आहे. ज्या ठिकाणी गॅसवाहिन्या नाहीत, अशा क्षेत्रांना जोडण्यासाठी या मोबाईल युनिटचा मोठा फायदा होणार आहे. दुचाकी क्षेत्रातील ग्राहकांना पर्यावरणपूरक इंधनाचा फायदा करून देण्यासाठी भारतातील काही नामांकित संस्थांबरोबर एमएनजीएल रिव्हर्स इंजिनिअरिंग प्रकल्प विकसित करत आहे.

संतोष सोनटक्के म्हणाले, लॉकडाउननंतर, ऑटोरिक्षा चालकांच्या आर्थिक अडचणी विचारात घेता, पेट्रोलकडून सीएनजी वापराकडे वळणाऱ्या चालकांना निर्धारित नाशिक, धुळे, सिंधुदुर्ग, रामनगर या भौगोलिक क्षेत्रात सीएनजी किट कोणत्याही गुंतवणुकीशिवाय उपलब्ध करून देण्यासाठी बँका आणि किट बसविणाऱ्याशी बोलणी सुरू आहेत. किट बसविणारी संबंधित यंत्रणा सीएनजी किटची किंमत खाली आणतील, बँका रिक्षाचालकांना कमीत कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करतील आणि प्राथमिक टप्प्यात एमएनजीएल सहा हजार किटचा व्याजाचा भार सहन करेल. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी वापराचा खर्च जवळपास एक तृतीयांशने कमी होणार आहे. अशाप्रकारे, रिक्षाचालकांना त्यांच्या कामाच्या प्रमाणात रोज २०० ते ४०० रुपए बचत करता येईल आणि ते दोन वर्षांत रोज ४० ते ५० रुपए भरून कजार्ची परतफेड करू शकतील. त्यानंतर ते आयुष्यभर तीनचाकीही वापरू शकतील. ही प्रक्रिया तीनचाकीमध्ये परिवर्तित होण्यासाठी अतिशय सोपी ठरणार असून त्यामध्ये कोणतेही कष्ट पडणार नाहीत तसेच आर्थिक लाभही मिळतील.

ग्राहकांना परवडणाºया दरात आणि त्यांच्या घरापर्यंत नैसर्गिक वायू पुरवठा करण्यासाठी आणि ग्राहकांना संपूर्ण समाधान देण्यासाठी एमएनजीएल त्यांचे नेटवर्क विस्तारत आहे. त्यासाठी निर्धारित भौगोलिक क्षेत्रात डिसेंबर २०२१पर्यंत १५० सीएनजी स्टेशन्स तयार करणार आहे. पुढील वर्षात ४० ते ५० सीएनजी स्टेशन सुरू करण्यात येणार असून एक लाख घरगुती ग्राहक जोडण्यात येणार आहेत.