Pune News : विकास कामांच्या ‘थर्ड पार्टी’ ऑडीटची महापालिका ‘गुणवत्ता’ तपासणार ; झोननिहाय 7 अभियंत्यांचा स्वतंत्र सेल स्थापन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे महापालिकेच्यावतीने विकासकामांचे ‘थर्ड पार्टी’ ऑडीट करण्यात येते. विशेषत: या कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येते. परंतू यानंतरही कामांचा दर्जा आणि राज्य शासनाच्या ऑडीटमध्ये प्रशासनावर ताशेरे ओढले जात असल्याने महापालिकेच्या दक्षता विभागाने ‘थर्ड पार्टी’ ऑडीटची तपासणी करण्यासाठी झोननिहाय अधिकारी नेमले आहेत.

महापालिकेच्यावतीने शहरात नागरी सुविधांची कामे करण्यात येतात. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, ड्रेनेज, पाईपलाईन, पदपथ, उद्याने, प्रशासकीय व सेवा इमारती, सांस्कृतीक भवन , क्रिडांगणे अशा विविध कामांचा यामध्ये समावेश आहे. २५ लाखांहून अधिक रकमेच्या कामाची गुणवत्ता, येणारा खर्च याची तपासणी करण्यासाठी महापालिकेने ‘थर्ड पार्टी’ ऑडीट बंधनकारक केली आहे. परंतू यानंतरही कामांच्या गुणवत्तेबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असतात. एवढेच नव्हे तर ठेकेदारांकडूनही बरेचदा थर्ड पार्टी ऑडीटच्या प्रदानांबाबत घोळ घालण्यात आल्याचे राज्य शासनाकडून करण्यात येणार्‍या ऑडीटमधून समोर येते.

महापालिकेच्यावतीने दरवर्षी एक हजारहून अधिक कोटींची विकास कामे करण्यात येतात. हजारो छोट्या मोठ्या कामांच्या निविदा काढण्यात येतात. या कामांच्या फायलींचा निपटारा करतानाही कर्मचारी वर्गाची दमछाक होत असते. यातूनही ‘दबावाखाली’ त्रुटी असतानाही कोट्यवधी रुपयांची बिले मंजूर केली जातात, ही बाब सातत्याने समोर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर थर्ड पार्टी ऑडीट केलेल्या कामांची तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून. यासाठी स्वतंत्र सेल करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या विविध पाच झोनसाठी सात अभियंत्यांची झोननिहाय नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.