Pune News : खासगी बँकेचा निष्काळजीपणा व्यापाराला चांगलाच महागात पडला; 36 लाख 58 हजारांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खासगी बँकेचा निष्काळजीपणा व्यापाराला चांगलाच महागात पडला असून, सायबर चोरट्याने त्या व्यापाऱ्याच्या नावाने बनावट सहीचा मेल पाठवून 36 लाख 58 हजारांची फसवणूक केली आहे. ऑनलाइन हे पैसे पाठवण्यात आले आहेत.

याप्रकरणी ६५ वर्षीय जेष्ठाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बँकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी, चार व्यक्ती आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोखंडाचे व्यापारी आहेत. ते सेव्हन लव्हज चौकात राहातात. त्यांचे एका खासगी बँकेत खाते आहे. ९ मार्च रोजी सायबर चोरट्याने त्यांच्या बनावट सहीचा मेल बँकेला पाठविला. माझ्याकडील चेकबुक संपले आहेत. मला तत्काळ रक्कम एकाला द्यायची आहे. कृपया बँकेने आरटीजीएसद्वारे रक्कम वर्ग करावी, असा हा मेल होता. बँकेने देखील कोणतीच खातरजमा न करता फक्त मेलवर 36 लाख 58 हजारांची रक्कम सायबर चोरट्यांने सांगितलेल्या बँकखात्यात पाठवली. बँकखात्यातून रक्कम कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर फिर्यादी यांना समजले. त्यांनी माहिती घेतली असता त्यांना हा प्रकार समजला. मग त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासला सुरुवात केली आहे.

दरम्यान बँकेकडून माहिती मागविली आहे. ती आल्यानंतर काही माहिती समोर येईल, असे सांगण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे या करत आहेत.