Pune News : बिल्डरला भीती दाखविण्यासाठी ऑफिस बॉयचे अपहरण, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून दोघा अपहरणकर्त्यांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – बांधकाम व्यावसायिकाला भिती घालण्यासाठी त्याच्या ऑफिस बॉयचे अपहरण करुन खंडणी मागणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथकाकडून अटक केली. आकाश सुग्रीव घोडेस्वार उर्फ गणीभाई (वय २९) व राहूल बाळू घोरपडे (वय २२, दोघेरी रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत साईकुमार शिवमुर्ती जावळकोटी (वय ५१, रा. सिंहगड रोड) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वारजेतील बांधकाम व्यावसायिक साईकुमार यांच्या कार्यालयात एक मुलगा कामाला आहे. काल सकाळी त्याचे शिवगंगा सोसायटीतील मायरा इनक्लेव्ह येथून आरोपी आकाश उर्फ गनीभाईसह साथीदाराने जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी साईकुमार यांना फोन करून मुलाला सोडून देण्यासाठी २ लाख रुपयांची खंडणी मागितली. साईकुमार यांनी तातडीने याची माहिती वारजे पोलिसांना दिली. अपहरणकर्त्यांनी मुलाला येरवड्यातील लक्ष्मीनगरमध्ये एका खोलीत कोंडून ठेवले होते. आरोपींमध्ये पैसे मागण्यावरुन वाद सुरु झाला. आरोपी एकमेकांशी भांडू लागले असल्याची संधी साधून मुलाने खोलीतून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.

यातील एका मुलाचे कामाचे 14 लाख रुपये या बांधकाम व्यावसायिकाकडे असल्याचे तो मुलगा सांगतो. पण बांधकाम व्यावसायिक तो पैसे देत नाही. त्यामुळे त्याला भीती दाखविण्यासाठी दोघांनी या ऑफिस बॉयचे अपहरण केले असल्याचे तपासात समोर आले आहे. ही कारवाई अपर आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, प्रदीप शितोळे, विनोद साळुंके, विजय गुरव, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, प्रवीण पडवळ यांच्या पथकाने केली.