Pune News : मकरसंक्रांतीनिमित्त दत्तमहाराजांना 101 किलो तिळगूळ आणि हलव्याचे दागिने व अंगरख्याचा महानैवेद्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हलव्याचा नयनरम्य नववर्तुळाकार हार, मुकुट, कंबरपट्टा… काजू, बदाम, सुके अंजीर, किवी, अननस इत्यादी सुकामेव्याने दत्तमहाराजांचा अंगरखा सजला होता. तसेच तिळगूळ, गूळ पोळी, तिळ वडी, तिळ पापडी, गूळाच्या ढेपी व गूळाच्या मोदकांच्या तोरणांनी सजलेले दत्तमंदिर पाहण्याकरीता भाविकांनी गर्दी केली. मकरसंक्रांतीनिमित्त कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमहाराजांना १०१ किलो गूळ, तिळगूळ आणि हलव्याच्या दागिन्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, खजिनदार बी. एम. गायकवाड, उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, उपउत्सव प्रमुख नंदकुमार सुतार, विश्वस्त अंकुश काकडे, अ‍ॅड.एन.डी.पाटील, उल्हास कदम, चंद्रशेखर हलवाई यांसह भाविक उपस्थित होते. सुभाष सरपाले व सहका-यांनी ही आरास साकारली.

अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, मकरसंक्रातीनिमित्त यंदा सुकामेव्याचा अंगरखा हे विशेष आकर्षण होते. सुमारे ६० किलो गूळ, ४५ किलो रंगीत काटेरी हलवा, तीळ, गूळ पोळी, तिळ वडी, पापडी, मोदक, गुळाच्या ढेपी वापरुन ही आरास केली. याशिवाय रंगीबेरंगी पतंगांची व फुलांची सजावट देखील मंदिरात करण्यात आली. सजावटीतील पदार्थ अनाथालय व वृद्धाश्रमांना देण्यात येणार आहेत.