Pune News : पोलिस आयुक्तालयापासून हकेच्या अंतरावर बिल्डरचा खून करणार्‍या आरोपींसोबत ‘तोडपाणी’ ?, तपासादरम्यान पर्दाफाश, पोलिस हवालदार निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील बिल्डर राजेश हरिदास कानाबार (वय 63) यांचा पुणे पोलीस आयुक्तालयाच्या काही अंतरावर गोळी झाडून खून करण्यात आला होता. जमीनीच्या आर्थिक वादातून हा प्रकार घडला होता. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार व इतर संशयित आरोपीबरोबर बैठक करणाऱ्या चंदननगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे. परिमंडळ चारचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास बंडगार्डन पोलीस करत असून तपासात हा प्रकार समोर आला आहे. त्यांनी डिफॉल्ट रिपोर्ट पाठवला होता. त्यात कारवाई करण्यात आली असून, चौकशीत सर्व काही निष्पन्न होईल असे उपायुक्त देशमुख यांनी सांगितले.

परमेश्वर तुकाराम सोनके असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ही घटना 5 ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली होती. बावधन बुद्रुक येथील जमिनीचा निकाल कानाबार यांच्या बाजूने लागणार असल्याचा अंदाज आल्याने आरोपींनी त्यांचा खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

राजेश हरिदास कानाबार यांचा खून करण्यासाठी राजेश शामलाल साळुंके (वय-38 रा. सुखसागरनगर, कात्रज) याने मारेकऱ्याला पिस्तुल आणि काडतुसे पुरवल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. तो आणि त्याचा साथीदार राकेश रमेश बुरटे (वय-36 रा. जनता वसाहत, पर्वती, मूळ रा. रत्नागिरी) हे मुख्य सुत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते.

गुन्ह्यातील आरोपी राजेश सोळुंके आणि राकेश बुरटे, रोहीत विजय यादव यांच्यासोबत पोलिस हवालदार परमेश्वर सोनके हे चंदननगर येथील एका हॉटेलमध्ये बैठकीत बसल्याचे सीसीटीव्हीवरुन सिद्ध झाले. घटनेनंतर हे सर्व आरोपी रात्री साडेनऊच्या सुमारास गप्पा मारत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी आणि सोनके हे त्या ठिकाणी बसल्याबाबत साक्षीदारांकडून दुजोरा देण्यात आला आहे.

सोनके याच्या संपर्कात आरोपी आलेले असतानाही, त्याने आरोपींना पोलिसांसमोर हजर न करता पोलिसांना माहिती दिली नाही. पोलीस हवालदार सोनके याने आरोपींना मदत करण्याच्या हेतून कृत्य केल्याने,पोलीस दलाची शिस्त मलीन केल्याने, पोलीस शिस्तीस बाधा आणणारे असल्याने आरोपींना मदत करणारे असल्याने निष्काळजीपणा व बेजबाबदारपणे गैरवर्तन केल्या प्रकरणी परिमंडळ चारच्या पोलीस उपायक्तांनी सोनके यांच्या निलंबनाचे आदेश काढले.