Pune News : शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याकडून 27 वर्षीय तरुणीकडे शरीरसुखाची मागणी; बंडगार्डनमध्ये FIR दाखल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – एका गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला मदत करतो असे सांगत पोलीस हवालदाराने त्याच्या बहिणीसोबत ओळख वाढवत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार दादाराम ताकमोडे या कर्मचाऱ्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 27 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दादाराम हे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहेत. तर यातील फिर्यादी तरुणीच्या भावावर स्वारगेट पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे. त्याला बंडगार्डन पोलीस ठाण्यात लॉकअपमध्ये ठेवले आहे. यादरम्यान संबंधित पोलीस हवालदाराने या तरुणीला भावाला मदत करण्याच्या बहाणा केला. तसेच तरुणीची ओळख करून घेतली. तिचा मोबाईल नंबर घेतला आणि ओळख वाढवली. त्यानंतर वेळीवेळी तिच्याशी फोनवर बोलत राहिला. त्यांनतर 24 डिसेंबर 2020 रोजी लग्नासाठी स्थळ दाखविण्याचा बहाना करत तिला पुणे स्टेशन परिसरातील एका लॉजवर घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तरुणीने तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.