Pune News : पुण्यातील कोरेगाव पार्क मधील हॉटेल ‘मर्फीज’, ‘टल्ली’, ‘डेली’ आणि हॉटेल ‘पब्लिक’वर पोलिसांकडून कारवाई; केलं होतं ‘कोरोना’च्या नियमांचे उल्लंघन

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नियमांचे पालन न केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क येथील 4 बड्या हॉटेल्सवर पोलिसांनी रात्री कारवाई केली आहे. यामुळे शहरात आस्थापना नियम धाब्यावर बसवत असल्याचे देखील दिसत आहे.

हॉटेल मर्फीज लेन नंबर 6, हॉटेल टल्ली लेन, हॉटेल डेली आणि हॉटेल पब्लिक लेन नंबर 7 अशी कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल्सची नावे आहेत. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भादवी कलम 188, 269 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने हॉटेल्स व इतर आस्थापना याना नियम घातले आहेत. त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. हॉटेल्स 10 पर्यंत सुरू ठेवणे व 50 टक्के क्षमतेने ते असावे, असा पहिला नियम आहे. पण यादरम्यान अनेक ठिकाणी 10 नंतर देखील गर्दी होत आहे.

दरम्यान कोरेगाव पार्क हा उच्चभ्रू परिसर. पब आणि मोठं मोठी हॉटेल्स म्हणून प्रसिद्ध असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याठिकाणी पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार परिमंडळ दोनचे उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पार्क पोलीस ठाणे व त्यांच्या अधिकाऱ्यांनी येथे कारवाई केली आहे. याठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त ग्राहक तसेच दर्शनी भागात क्षमता व इतर माहिती न दिल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.