Pune News : कर्नाटकमधील गुटखा कंपन्यांवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! 120 कोटी रुपयांचा विमल गुटखा, त्याला लागणार कच्चा माल आढळला, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात गुटखा कारवाई केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुटखा वितरक ते उत्पादन करणाऱ्या कंपन्या देखील सोडल्या नसून, गुजरातनंतर आता पोलिसांनी कर्नाटक शहरात जाऊन एका विमल उत्पादन करणाऱ्या कंपनीवर कारवाई केली आहे. कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर मनोज श्रीवास्तव यांना ताब्यात घेतले होते.

याप्रकरणी कर्नाटक येथील तुमकुर येथे विमल कंपनीवर छापा टाकला. त्यावेळी पुण्यात व महाराष्ट्रात पुरवठा करणारा मॅनेजिंग डायरेक्टर मनोज श्रीवास्तव याला ताब्यात घेतले होते. पण त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने पुण्यात आणले जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी पोलीसनामाला बोलताना सांगितले.

शहरात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुतावरून स्वर्ग गाठला असे म्हंटले जाऊ लागले असून, पुण्यात एक गुटखा कारवाई केल्यानंतर मात्र त्याच कारवाईला धरून तबल 28 ठिकाणी छापेमारी केली आहे. यात जवळपास आतापर्यंत 18 जणांना अटक केली आहे. तर कोट्यवधी रुपयांचा गुटखा देखील पकडला गेला आहे. तर हवाला रॅकेट देखील उघडकीस आणत 9 जणांना पकडले होते. अर्थातच त्या 9 जणांची नावे शेवट पर्यंत पोलिसांनी उघड केली नाहीत. पण येथून 4 कोटी रुपयांचा हवालाचा पैसे जप्त केला होता.

दरम्यान, यानंतर गुजरात येथील वापी व इतर ठिकाणी गुटख्या कंपन्यांवर कारवाई करत 15 कोटी रुपयांचा गुटखा पकडला होता. त्यानंतर आता या कारवाईनंतर कर्नाटक येथील तुमकुर येथे दोन कंपन्यांवर स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापेमारी केली आहे. येथे छापा टाकल्यानंतर 120 कोटी रुपयांचा विमल गुटखा, त्याला लागणार इतर माल सापडला आहे. यावेळी पोलिसांनी एफडीए यांना याचा रिपोर्ट दिला असून, हा गुटखा महाराष्ट्र व पुण्यात पाठवला जात आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे कारवाई करावी, असे सांगितले आहे. यामुळे कर्नाटकात खळबळ उडाली आहे.
कर्नाटकात गुटखा बंदी नाही. गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री व उत्पादन होते. पण आता या कारवाईने मोठीच खळबळ उडाली आहे.

…तरीही पुण्यात तेजीत गुटखा विक्री
पुणे पोलीस गुटखा कारवाई करत आहेत. दोन महिन्यात 28 ठिकाणी छापेमारी करत कोट्यवधी रुपयांचा गुटखा पकडला आहे. पण तरीही पुण्यात गुटखा विक्री मात्र तेजीत सुरू आहे. टपऱ्या-टपऱ्यावर गुटखा मिळत आहे. विशेष म्हणजे केवळ दोन दिवस गुटखा विक्रेत्यांना गुटखा मिळण्यास थोडी अडचण झाली. पण नंतर ती देखील सुरळीत झाली. त्यामुळे गुटखा कारवाई होत असताना गुटखा मिळतो कसा असा साधा प्रश्न नागरिकांना पडला आहे. नेमकी कारवाई होते कशी अन् नंतर गुटखा मिळतो कसा असे प्रश्न पडू लागले आहेत.