Pune News : तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून शेतकरी आणि नागरिकांमध्ये ग्राहक पेठ करते ‘सेतू’चे काम – ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  अनेक वर्ष शेतकरी संकटात होता आणि आता कोरोना, शेतकरी आंदोलन यामुळे आपला शेतकरी अवघड काळातून जात आहे. या संकटामुळे शेतकरी भरडला जात आहे. त्याचे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. शेतकरी आंदोलनामुळे तांदूळ महोत्सवात जो तांदूळ पोहोचला नाही, तो लवकरात लवकर पोहोचला तर शेतक-यांसोबत आपल्याला देखील आनंद होणार आहे. यासाठी ग्राहक पेठ सेतूचे काम करत आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.

ग्राहक पेठेच्या वतीने सदाशिव पेठ खजिना विहिर चौक येथे आयोजित २८ व्या तांदूळ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, जयराज अ‍ॅन्ड कंपनीचे राजेश शहा, महोत्सवाचे प्रमुख शैलेश राणीम, उदय जोशी यावेळी उपस्थित होते. बासमती, आंबेमोहोर, दुबराज पासून इंद्रायणी पर्यंत तब्बल ४५ प्रकारचे तांदूळ महोत्सवात पहायला मिळत आहेत.

अरुणा ढेरे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या स्वयंपाकात विविधता आहे. मराठवाडा, खान्देश, विदर्भ अशा विविध भागात विविध प्रकारे खाद्यपदार्थ केले जातात. घटक पदार्थ जरी समान असले तरी बनविण्याची पोत प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे. त्यामुळे चवीमध्ये बराच फरक आहे. यामुळे महाराष्ट्रातील स्वयंपाक हा विविधतेने नटलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.

राजेश शहा म्हणाले, मागील २८ वर्षांपासून ग्राहक पेठ तांदूळ महोत्सव सुरु आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा तांदूळ स्वस्त दरात ग्राहकांपर्यत या माध्यमातून पोहोचत आहे. तब्बल ४५ प्रकारचे तांदूळ या महोत्सवात ग्राहकांकरिता उपलब्ध करुन देण्यात येणे, हे याचे वैशिष्टय आहे.

सूर्यकांत पाठक म्हणाले, महोत्सवाच्या निमित्ताने ग्राहकांचे व प्रामुख्याने महिलांचे एकत्रिकरण होत आहे. ग्राहकाने एका वेळेस १०० किलोपेक्षा अधिक तांदूळ खरेदी केल्यास शहरात विनामूल्य घरपोच सेवा दिली जाणार आहे. महोत्सवात उत्तमप्रतीचा तांदूळ थेट महाराष्ट्राबाहेरील राज्यांसह नाशिक, मावळ, भोरहून पुणेकरांसाठी उपलब्ध दिला जात आहे. याशिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला तांदूळ देखील महोत्सवात अत्यल्प दरात उपलब्ध आहे. तरी ग्राहकांनी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.