Pune News : आर्क्युतर्फे आयोजित ‘फ्युचर ऑफिस’ आंतरराष्ट्रीय स्पर्धा ‘एसएमईएफ ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’च्या विद्यार्थ्यांनी जिंकली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  आर्क्युतर्फे आयोजित फ्युचर ऑफिस या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुणे येथील एसएमईएफ ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ने पहिला क्रमांक पटकावला आहे. कोव्हिड-१९ महामारीच्या पश्चात कार्यालयात होणारे बदल आणि कार्यालये अधिक उत्पादनक्षम होण्यासाठी करावे लागणारे नियोजन याबाबत स्पर्धकांचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

फ्युचर ऑफिस या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जगभरातून अर्ज प्राप्त झाले होते. स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्चर) क्षेत्रात काम करणारी ही एक संस्था असून ती वेगाने वाढत आहे. आर्किटेक्ट म्हणून विविध विषय आणि प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन नवसंकल्पनाधारित स्पर्धा आयोजित करण्याचे काम त्यामार्फत केले जाते.

एसएमईएफ ब्रिक ग्रुपच्या प्राचार्या डाॅ. पूर्वा केसकर म्हणाल्या, फक्त परीक्षा, पाठ्यपुस्तके आणि वर्गांपुरते शिक्षण मर्यादित नसते. शिकण्याच्या आणि शिकविण्याच्या पारंपारिक पद्धतींच्या पलिकडे जाऊन जागतिक दृष्टीकोनातून शिक्षण देण्याचा हा प्रयत्न आहे. आमच्यासाठी त्यातून शिकण्यासारख्या अमर्यादित संधी आहेत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील आव्हानांना सामोरे जाणे आणि बहुशाखीय परस्पर संवाद वाढविण्यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या स्पर्धेत आमचे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत याचा आम्हाला अभिमान आहे.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक अशा स्पर्धांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे आणि त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक विशेष स्पर्धा कक्ष निर्माण केला आहे. अनेक प्रोफेशनल्ससोबत काम करण्यासाठी तसेच वेळेचे नियोजन आणि एकाचवेळी अनेक गोष्टी सहजरित्या करण्याचे प्रशिक्षण या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना मिळते, असेही त्या म्हणाल्या.

एसएमईएफ ब्रिक ग्रुपच्या संस्थापक संचालक पूजा मिसाळ म्हणाल्या, आव्हानांवर मात करण्यासाठी करण्यात येणारे उपाय सर्वंकष असावेत यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याबाबत आम्ही संस्थेमार्फत प्रयत्नशील असतो. त्यामुळे आमच्या संस्थेला जागतिक पातळीवरील व्यासपीठांवर संधी मिळते आणि त्यातून विद्यार्थ्यांना फायदा होतो. प्रत्येक स्पर्धा ही शिकण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून मदतीस येते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनुभवामध्ये भर पडते.

फ्युचर ऑफिस स्पर्धेमध्ये भविष्यातील मात्र सद्यस्थितीला अनुसरून असलेल्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. कोव्हिड-१९ महामारीच्या पश्चात कार्यालयात होणारे बदल आणि कार्यालये अधिक उत्पादनक्षम होण्यासाठी करावे लागणारे नियोजन याबाबत स्पर्धकांचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शारीरिक अंतर राखत कार्यालयातील आपल्या आजूबाजूचा भाग अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने काय उपाय करता येतील याचा विचार स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला.

स्पर्धेतील विजेते सिमरन बराई आणि भव्या बत्रा म्हणाल्या, सध्याच्या नवीन नाॅर्मल परिस्थितीमध्ये व्यक्ती-केंद्रित पैलूंचे महत्व लक्षात घेऊन ऑफिसची रचना करण्याचे आमचे उद्दिष्ट होते. सार्वजनिक स्वच्छता, सूर्यप्रकाश, खेळती हवा आणि घनता यासारख्या मुद्द्यांना यापुढे महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे व्यक्ती-केंद्रित पैलूंचे महत्त्व अबाधित राखून नवीन नाॅर्मल परिस्थितीतील  ऑफिसची रचना आम्ही केली. माणसाला दुसऱ्या माणसाच्या सहवासाची नितांत गरज भासते आणि त्यामुळे ऑफिस हे आपले दुसरे घर असल्यासारखेच असते व या दृष्टीकोनातून कार्यालयीन जागेमध्ये सुरक्षित वाटणे आणि आपुलकीची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने डिझाईन तयार करण्यात आले.

याचा हेतू अनुभव आणि कामकाजाला प्रत्यक्ष सुरवात करण्याचा होता. बाहेरच्या जगात आपण स्वतःला झोकून दिल्याशिवाय आपल्याला आपली क्षमता समजत नाही आणि जगामध्ये काय चालले आहे याची समजही येत नाही. स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे आमचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे आणि या प्रचंड व्याप्ती असलेल्या क्षेत्रामध्ये आपले वैशिष्ट्य काय आहे हे ओळण्यासाठी आम्हाला मदत झाली आहे, असेही त्या म्हणाल्या.

पूजा मिसाळ यांनी एसएमईएफ ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची स्थापना २०१३ मध्ये केली असून संस्थेला सात वर्ष पूर्ण झाली आहे. सर्फेस रिपोर्टरने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात एसएमईएफ काॅलेज हे देशातील टाॅप २५ महाविद्यालयांमध्ये अधोरेखित झाले आहे.