Pune News : औंधकरांना प्रवासासाठी किफायतशीर ठरतेय ‘टून – टून’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  वाहतुकीची कोंडी, पार्किंगचा प्रश्‍न, सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वानवा अशा बिकट परिस्थितीत ‘औंधकरांना’ उपयुक्त ठरतेय ‘टून-टून’ सेवा..आश्‍चर्य वाटले ना. पण औंध येथील नगरसेविका अर्चना मुसळे आणि त्यांचे पति ऍड. मधुकर मुसळे यांनी स्थानीक नागरिकांसाठी अवघ्या १० रुपयांत औंध परिसरात पाच कि.मी. अंतरावरील प्रवासासाठी सीएनजीवर धावणार्‍या मोटारी उपलब्ध करून दिल्या आहेत. अगदी मोबाईलवर कॉल करून दारापयर्र्ंत मिळणार्‍या या सेवेचा दरमहा १२ ते १४ हजार प्रवासी लाभ घेत आहेत.

दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतुक कोंडीतून पुणेकरांची सुटका करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सुधारणेसाठी प्रशासनाकडून बीआरटी, मेट्रो, पीएमपीचे सक्षमीकरण, सायकल ट्रॅक, ई बाईक असे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सार्वजनिक वाहतुकीसोबतच पर्यावरणाचाही विचार करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर औंध येथील अंतर्गत वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी स्थानीक नगरसेविका अर्चना मुसळे आणि त्यांचे पती ऍड. मधुकर मुसळे यांनी ‘टून-टून’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

ऍड. मधुकर मुसळे यांनी सांगितले, की सीएनजीवर धावणार्‍या आणि चार आसनांची क्षमता असलेल्या पाच मिनीमोटारी घेण्यात आल्या आहेत. औंधमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मेडीपॉईंट हॉस्पीटल, विद्यापीठ चौक, बाणेर फाटा, राजीव गांधी पूलापर्यंतच्या पाच कि.मी.च्या परिसरात फक्त दहा रुपयांत सेवा देण्यात येते. तर कॉल करून घरापर्यंत मोटार मागवून घेतली तर २० रुपये आकारले जातात. व एकापेक्षा अधिक व्यक्ती असतील तर पुढील व्यक्तिसाठी फक्त दहा रुपये आकारले जातात. सकाळी ७ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत ही सेवा सुरू असते.

स्थानीक परिसरात पीएमपीची लोकल बस सर्व्हिस नाही. तसेच रिक्षाचालकही जवळच्या प्रवासाला नकार देत असल्याने बहुतांश वेळा चालत अथवा घरातील गाडी घेउनच बाहेर पडावे लागते. प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी वर्ग आणि महिलांची अधिकच कुंचबणा होते. त्यामुळे ही गरज लक्षात घेउन ‘टून-टून’ सेवा सुरू करण्यात आली आहे. दरमहा १२ ते १४ हजार स्थानीक नागरिकांना या सेवेचा लाभ होत आहे, अशी माहिती ऍड. मुसळे यांनी दिली.