Pune News : डोक्यात दगड घालून खून करणारे दोघे जेरबंद, हडपसर पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलिसांना आपली ओळख सांगेल या भीतीने डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या दोन सराईतांना हडपसर पोलिसांनी पकडले. हडपसर पोलीस स्टेशनच्या वतीने अधिकारी- अंमलदारांच्या तीन पथकाने २५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचा तपास करून आरोपीला पकडल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली.

सतीश संजय सुतार (रा. नऱ्हे, सिंहगड रोड, पुणे) आणि मिलिंद सोनबा पवळे (रा. धायरी फाटा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

राहुल श्रीकृष्ण नेने (वय ४५, रा. नागनाथ पार्क, सदाशिव पेठ) यांचा खून करून आरोपींनी मृतदेह पर्वती येथील कालव्यात टाकला होता.

पोलिसांनी सांगितले की, हडपसर शिंदेवस्ती येथील कालव्यात १५ मार्च २०२१ रोजी मृतदेह वाहत आला होता. त्याचा तपास करण्यासाठी तीन पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी २५० अधिक सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधाराने मृत व्यक्ती सिंहगड भागातील असल्याचे समजले. त्यानुसार धायरी-सिंहगड रोड, संतोष हॉल, राजाराम पुल, दांडेकर पुल या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना मृत व्यक्तीला आरोपी मोपेडवर घेऊन जात असताना दिसून आले. त्यानुसार तपास केला असता आरोपीने मृत व्यक्तीला मारहाण करून एटीएममध्ये नेऊन पैसे काढून घेतले. मात्र, तो आपली ओळख पोलिसांना सांगेल या भीतीने त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले आणि पर्वती येथील कालव्यात फेकून दिल्याची आरोपींनी कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, दिगंबर शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, सैदोबा भोजराव, अविनाश गोसाव, संदीप राढोड, नितीन मुंढे, शशिकांत नाळे, अकबर शेख, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, सचिन जाधव, शाहीद शेख, समीर पांडुळे, निखील पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.