Pune News : दुर्देवी ! कोळवणजवळ ओढ्यात बुडून 5 जणांचा मृत्यू, आई-वडिल अन् 3 मुलींचा समावेश; पुण्यातील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ओढ्याजवळ धुणी धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा 3 मुली आणि पतीसह बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील कोळवण जवळील वाळेन येथे आज (रविवारी) घडली आहे. या घटनेत पाचही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पाचही मृतदेह ओढ्यातून बाहेर काढण्यात मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला यश आले असल्याची माहिती पोलिस नाईक रविंद्र नागटिळक यांनी दिली आहे.

शंकर दशरथ लायगुडे (38), पोर्णिमा शंकर लायगुडे (36), आर्पिता शंकर लायगुडे (20), अंकिता शंकर लायगुडे (13) आणि राजश्री शंकर लायगुडे (12, सर्व रा. वाळेन, कोळवणजवळ, ता. मुळशी, जि. पुणे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पोर्णिमा लायगुडे या आज (रविवार) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ओढ्याजवळ धुणी धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांचा पाय घसरला आणि त्या ओढयात बुडाल्या. त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या तिन्ही मुलींनी ओढयाकडे धाव घेतली आणि त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्या तिन्ही मुली देखील ओढयात बुडाल्या. हा प्रकार शंकर दशरथ लायगुडे यांना समजल्यानंतर त्यांनी देखील ओढयाकडे धाव घेतली आणि कुटुंबाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते देखील ओढ्यात बुडाले अशी माहिती पौड पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथकास याबाबतची माहिती कळविण्यात आली. त्यांनी ओढ्यात बुडालेल्या सर्व बॉडी बाहेर काढल्या आहेत. याबाबत पौड पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम चालू आहे. पौड पोलिसांना घटनेची खबर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास समजल्याचे पौड पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक रविंद्र नागटिळक यांनी सांगितले आहे. दरम्यान, घडलेल्या या दुर्देवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. घटना नेमकी कशी घडली याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.