Pune News : ‘व्ही- स्मार्ट इन्फोटेक’ला गो. स. पारखे औद्योगिक मान पुरस्कार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   औद्योगिक क्षेत्रातील नाविण्यपूर्ण उत्पादनासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरतर्फे (एमसीसीआयए) दिला जाणारा गो. स. पारखे औद्योगिक मान पुरस्कार पुण्यातील ‘व्ही- स्मार्ट इन्फोटेक’ला देण्यात आला आहे. व्ही- स्मार्ट इन्फोटेक बरोबरच ‘अर्थ केअर इक्वीपमेंट प्रा. लि.’ आणि ‘रामेलेक्स प्रा. लि.’ यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

मराठा चेंबरचे वार्षिक पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. उद्योजकतेला चालना देण्यासाठी गेल्या सात दशकाहून अधिक काळ चेंबरच्या वतीने विविध पुरस्कार देण्यात येतात.

व्ही- स्मार्ट इन्फोटेक इंकॉर्पोरेशन ही व्ही- स्मार्ट उद्योग समुहातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीने विकसित केलेल्या स्मार्ट कास्ट प्रो या नाविण्यपूर्ण उत्पादनासाठी कंपनीची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

स्मार्ट कास्ट प्रो हे उत्पादन कास्टींगच्या क्षेत्रात क्रांती करणारे ठरणार असून त्याच्या मदतीने कास्टींग्जचे रिजेक्शन मोठ्या प्रमाणात कमी होईल, परिणामी लाखो रुपयांची बचत होऊ शकेल, असे कंपनीच्या अध्यक्षा मृणालिनी विजयसिंह चव्हाण यांनी सांगितले.

औद्योगिक क्षेत्रातील संशोधन, नाविण्यपूर्ण उत्पादन, कार्यपद्धती, डिझाईन, सेवा तसेच आयात पर्यायी उत्पादनाच्या निर्मितीसाठी उद्योजक कै. गो. स. पारखे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ्य त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने 1947 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. औद्योगिक क्षेत्रात या पुरस्काराला अत्यंत मानाचे स्थान आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हे पुरस्कार देता येतील का, या बाबत साशंकता होती. परंतु हे पुरस्कार जाहीर करून मराठा चेंबरने उद्योजक, त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, संशोधन व सेवांना चालना देण्याची गेल्या सात दशकांची परंपरा जतन केली आहे, असे चेंबरचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी सांगितले. करोनाची परिस्थिती निवळताच पुरस्कार वितरण कार्यक्रमाची तारीख निश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.