Pune News : कोंढव्यात कपडे काढून तरुणाला बेदम मारहाण; खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल दोघांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन –3 महिन्यांपुर्वी चुलतीला शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरूणाचे कपडे काढून त्यास दगडाने मारहाण केल्याची घटना कोंढव्यात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

शहनवाज शेख (वय २२) आणि सय्यदअली कुरेशी ऊर्फ गुटर्या (दोघे रा. कोंढवा खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचा अन्य एक साथीदार अरबाज शेख अशा तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले की ही कोंढवा खुर्द येथील काझी चौकाजवळील सोमजी येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजता घडली. फिर्यादी मोहसीन याने तीन महिन्यांपूर्वी अरबाज शेख याच्या चुलत्याला उसने पैसे मागण्यासाठी फोन केला होता. चुलत्याने फोन न उचलता चुलतीने फोन घेतला. त्यावेळी त्यांच्यात फोनवर पैशांवरुन वादावादी झाली. याचा अरबाज याला राग आला होता.

या दरम्यान अरबाज याने साथीदारांच्या मदतीने मोहसीन याला दगडाने मारहाण केली. त्यात त्याच्या कानाला दुखापत झाली. तसेच अंगावरील कपडे काढून मारहाण केली. त्यात मोहसीन जबर जखमी झाला आहे.

परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप माधाले यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मधाले अधिक तपास करीत आहेत.