Pune : पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून शिवीगाळ

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – मास्क न लावता तसेच सोशल डिस्टन्सचे पालन न करता स्पीकर लावून सार्वजनिक रस्त्यावर नाचणार्‍या तरुणांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. कात्रजच्या सच्चाई माता येथील पाण्याच्या टाकी जवळ सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.

संदीप सोमनाथ भोवते (वय 45) आणि सागर संदीप भोवते (वय 19) यांच्यावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई गणेश खंडू काळे (वय 24) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास आरोपी मास्क न लावता तसेच कोरोना नियमांचे पालन न करता डॉल्बी टाईप स्पीकर लावून त्यावर गाणे वाजवले. तर गोंधळ घालत होते. यावेळी फिर्यादी यांनी त्यांना गोंधळ घालू नका असे सांगत असतानाच आरोपींनी त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच ते गणवेशावर असताना देखील त्यांची कॉलर पकडून त्यांना ढकलून दिले, असल्याचे पोलिसांनी सांगितले.