काय सांगता ! होय, पुण्यात सुपर मार्केटमध्ये चक्क 9 लाखाची सिगारेट, पोलिसांनी केला ‘पर्दाफाश’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – संचारबंदीत अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा मालाची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे मात्र शहरात काही दुकानात गुटखा आणि सिगारेटची विक्री सुरू असल्याचे दिसत असून, पुण्यातील कल्याणीनगर भागात पोलिसांनी अश्याच एका सुपर मार्केट दुकानात छापा टाकून तबल 9 लाखांची सिगारेट पकडली आहे. खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

याप्रकरणी दुकानदार मानाराम नथुराम देवासी (वय ३२) याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, अत्यावश्यक सेवांमध्ये किराणा दुकान, मेडिकल, दूध आणि भाजीपाला सुरू आहे. मात्र काहीजण याचा फायदा घेऊन गुटखा, तंबाखू आणि सिगारेट ठेवून त्याची चढ्या भावाने विक्री करत आहेत. त्यावर पोलीसाकडून कारवाई केली जात आहे.

गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यावेळी खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकातील (पश्चिम) उपनिरीक्षक महाडिक यांना कल्यानीनगर येथील महेश सुपर मार्केट या दुकानात सिगारेटची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीची बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करण्यात आली. त्यात देवासी हा सिगारेट विकत असल्याचे दिसून आले. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक महाडिक आणि पथकातील संदीप साबळे,अमोल पिलानी,रमेश गरुड़,मोहन येलपले व चौधरी यांनी याठिकाणी छापा टाकला. यावेळी ८ लाख ८७ हजार २५२ रुपयाची सिगारेट जप्त केली आहे. त्यानुसार भा.दं.वि क. १८८, २६९, २७०,२७३ ,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे क. ५१(१)(ब), महाराष्ट्र कोविड १९ नियम २०२० चे क ११, संसर्गजन्य रोग कायदा १८९७ चे क. ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.