कर्णबधिरांवरील लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – समाजकल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधीर आंदोलकांवर पोलीसांनी केलेला लाठीहल्ला निषेधार्ह असून या असंवेदनशील प्रकाराची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

नोकऱ्या आणि शिक्षण याबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्यभरातून कर्णबधीर आंदोलक जमले होते. मागण्यांची तड लागावी याकरिता ते मुंबई पर्यंत जाणार होते. लोकशाही मार्गाने ते आंदोलन करीत होते. त्यांच्या मागण्यांबाबत भावना समजावून घेऊन प्रकरण हाताळण्याऐवजी त्यांच्यावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. कर्णबधीरांवरील लाठीहल्ला हा संवेदनशून्य म्हणावा लागेल. या लाठीहल्ल्याचा निषेध करीत असून याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी त्याचप्रमाणे कर्णबधीरांच्या मागण्यात सहानुभूतीपूर्वक लक्ष घालावे अशी मागणी जोशी यांनी केली आहे.