Pune : मोक्क्याच्या 2 गुन्ह्यात फरार असलेल्या दोघा सराईतांना चतुःश्रृंगी पोलिसांकडून कोल्हापूर जिल्ह्यातून अटक, गावठी पिस्तुलासह काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दोन मोक्काच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना चतुःश्रृंगी पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातून सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 गावठी पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आले आहेत.

सूरज उर्फ गणेश अशोक वड्ड (वय 24, रा. मंगळवार पेठ) व पंकज गोरख वाघमारे (वय 26, रा. गाडीतळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सूरज बंडू आंदेकर टोळीचा सदस्य आहे. बंडू आंदेकर टोळीवर नुकतीच मोक्कानुसार कारवाई केली आहे. यात सूरज याचा देखील समावेश आहे. तर या दोघांवर एका गुन्ह्यात चतुःश्रृंगी पोलिसांनी देखील मोक्का लावला आहे. दोन मोक्का कारवाई केल्यानंतर हे दोघे पसार झाले होते. त्यानंतर मात्र हे दोघे सापडत नव्हते. दरम्यान पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पाहिजे आरोपी व सराईत गुन्हेगार यांची माहिती काढून त्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यादरम्यान चतुःश्रृंगी पोलिसांच्या तपास पथकातील इरफान मोमीन व सुधीर माने यांना या दोघांबाबत माहिती मिळाली. ते दोघे कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर याठिकाणी असल्याचे समजले. यानुसार याची खातरजमा केली. त्यानंतर पथकाने याठिकाणी सापळा रचून दोघांना अटक केली. यावेळी सूरज याच्याकडून 1 गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सूरज याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबर मारहाण यासह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक आयुक्त रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, कर्मचारी सुधीर माने, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, संतोष जाधव, मुकुंद तारु, प्रकाश आव्हाड, प्रमोद शिंदे, ज्ञानेश्वर मुळे यांच्या पथकाने केली आहे.