Pune : पोलिस आयुक्तालयातील ‘क्राईम कंट्रोल’च बंद, मुख्य नियंत्रण कक्षात ‘विलीन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   गुन्हे शाखेचा महत्त्वाचा असलेला ‘नियंत्रण कक्ष’च बंद करत तो मुख्य नियंत्रण कक्षात ‘विलीन’ केला आहे. पुणे पोलिसांत पहिल्यांदाच हा प्रकार घडल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. पण यामुळे गुन्हे शाखेचा हात गळून गेल्यासारखी अवस्था झाली आहे. गुन्हेगारीची तुलना केल्यास मुंबईनंतर पुण्याचा क्रमांक लागतो, तर पोलीस कामकाजाच्या बाबतीतदेखील दुसर्‍या क्रमांकाचे पुणे पोलीस दल आहे. त्यातही पुण्याच्या गुन्हे शाखेचा बोलबाला राज्यात सर्वदूर आहे. एक अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त यांच्यासह मोठा फौज फाटा गुन्हे शाखेत कार्यरत आहे. समांतर काम चालत असताना गैर मार्गाला आळा घालणे गुन्हे शाखेचे प्रमुख काम. गुंड, टोळ्यांवर जरब गुन्हे शाखेची असली की शहर शांत असतं, असं म्हटलं जातं. त्यामुळे या विभागाला अनन्य साधारण महत्त्व. त्यामुळे गुन्हे शाखेचा दराराचा वेगळा आहे. त्यासाठी यंत्रणादेखील मोठा आहे. यासाठी आजपर्यंत आयुक्तालयात गुन्हे शाखेत स्वतंत्र गुन्हे शाखा नियंत्रण कक्ष होता.

शहरात काही घडल्यास त्याची खबर मुख्य नियंत्रण कक्षाला (100 क्रमांक) येते. ती खबर तात्काळ गुन्हे शाखेच्या नियंत्रण कक्षाला दिली जाते. त्यानंतर संबंधित युनिट घटनास्थळी दाखल होत. त्याचा फायदा स्थानिक पोलिसांना होताच, पण गुन्हे शाखादेखील सतर्क राहत असत. पण आता हा नियंत्रण कक्ष बंद केल्याने त्यांना माहिती मिळायलाच उशीर होत आहे. रात्रीची घटना दुसऱ्या दिवशी कळते अन् मग गुन्हे शाखा जागी होते आणि घटनास्थळी धाव घेत, आरोपींचा शोध घेते. पण, पोलीस आयुक्तांनी दोन नियंत्रण कक्ष का, असा प्रश्न उपस्थित करत गुन्हे शाखेचा नियंत्रण कक्ष बंद करत तो मुख्य नियंत्रण कक्षात मर्ज केला आहे. आयुक्तांच्या या आदेशानंतर मात्र, पोलीस दलातील जाणकारांनी उलट-सुलट चर्चा सुरू केली आहे.

यामुळे मात्र मुख्य नियंत्रण कक्षाचे काम वाढले असून, त्यांना आता सर्व गुन्ह्यांची नोंद करून त्यातील गंभीर गुन्ह्यांबाबत गुन्हे शाखेला कळवावे लागणार आहे. गुन्हे नियंत्रण कक्षाचे कर्मचारी गुन्ह्याची तात्कालिक माहिती घेत व ती अधिकाऱ्यांना सांगत. आता हेच काम मुख्य नियंत्रणातील कर्मचाऱ्यांना करावे लागत असून, त्याचा ताण येत आहे.

असे चालत असे काम…

शहरात गुन्हा घडल्यानंतर गुन्हे नियंत्रण कक्षातून तत्काळ त्याची माहिती युनिटला दिली जात, तो गुन्हा कोणत्या युनिटच्या हद्दीतील असेल त्यांना ते सांगितले जात. तसेच गुन्ह्याची थोडक्यात माहिती घेऊन त्याची गुन्हे शाखेच्या स्टेशन डायरीत नोंद केली जात. खून, दरोडा, गोळीबार अशा गंभीर गुन्ह्यांची माहिती गुन्हे शाखेच्या उपायुक्तांपासून ते सहायक आयुक्तांना दिली जात होती. तर गुन्हे शाखेचे कोणते युनिट तपासाला जात आहे, त्याची नोंद गुन्हे शाखेच्या या स्टेशन डायरीत केली जात. गुन्हे शाखेच्या नियंत्रण कक्षात दोन कर्मचारी चोवीस तास काम करत होते. पण, आता या नोंदी नाहीच, पण कळायलादेखील उशीर लागत असून, नेमके कर्मचारी जातात कुठं अन् करतात काय हेच समजत नाही.

दरोडा रात्री पडला अन् गुन्हे शाखेला दुसऱ्या दिवशी कळाले

शहरात नुकतीच एका दरोड्याची घटना घडली. हा गुन्हा रात्रीच्या वेळी घडला. पण त्याची माहिती गुन्हे शाखेला दुसऱ्या दिवशी दुपारी समजली. त्यानंतर गुन्हे शाखा कामाला लागली. पूर्वी मात्र अशा मेजर घटना काही वेळात गुन्हे शाखेला कळत होत्या अन् गुन्हे शाखा तेथे जाऊन भेट देत. तसेच समांतर तपासाला सुरुवात करत होती.

क्राईम कंट्रोल “मेन कंट्रोल”मध्ये समावेश केला आहे. क्राईम कंट्रोल जे काम करत होते, त्यासाठी मेन कंट्रोल आहे. किंबहुना तेच काम मेन कंट्रोल करत आहे. मेन कंट्रोल मोठे असून, मनुष्यबळदेखील मोठे आहे. त्यामुळे क्राईम कंट्रोलची गरज नव्हती. ती प्रणाली आता मेन कंट्रोलला अ‍ॅड केली आहे. त्याचे कर्मचारी युनिटला दिले आहे. हे काम सुरू असून, ते फक्त मेन कंट्रोलमधून सुरू आहेत.

बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

You might also like