Pune : अडचणीच्या काळात लोहमार्ग पोलिस आले आरोग्य प्रशासनाच्या मदतीला धावून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   अडचणीच्या काळात लोहमार्ग पोलिस मदतीला धावून आले असून, पोलिसांसाठी खरेदी केलेल्या उच्च रक्तदाब मोजण्याची मशीनसह इतर साहित्य जिल्हा आरोग्य प्रशासनाला देण्यात येणार आहेत.

राज्यासह पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत आहे. प्रशासन 24 तास काम करत असतानाही त्यांच्यावर मर्यादा येत आहेत. तर अनेक ठिकाणी गरज असलेल्या वस्तू देखील नाहीत. या कठीण काळात पुणे लोहमार्ग पोलिस प्रशासनाच्या मदतीला धावले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाने अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विविध वैद्यकीय उपकरणे खरेदी केली होती.

ज्यात प्राथमिक आरोग्य सुविधा, प्रतिबंधात्मक साधनांचा समावेश आहे. हे साहित्य आता जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुपूर्द करण्यात येणार आहे. पुणे लोहमार्ग पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांच्या सूचनेनुसार हे सर्व साहित्य दिले जाणार आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये 8 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, 8 ओझोन जेनरेटर, 8 रक्तदाब तपासणी मशीन, 20 ग्लुकोमीटर, 8 डिजिटल वजनकाटे, 19 वॉटर डिस्पेन्सर आदी साहित्याची खरेदी केली होती. त्यासाठी पुणे, सोलापूर, सांगली व नगर जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मौला सय्यद यांनी दिली.

कोरोना साथ रोगाच्या काळात कर्तव्यावर असलेल्या लोहमार्ग पोलिसांसाठी विविध प्रकारच्या वैद्यकीय साहित्याची खरेदी करण्यात आली होती. मात्र, समाजातील परिस्थिती पाहता, ते साहित्य समाजासाठी अधिक उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे, असे पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी सांगितले आहे.