IPL च्या सामन्यांवर सट्टा घेणार्‍यांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – आयपीएलच्या हंगामात सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या दोघाना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अहमदनगरमधून अटक केली. यापूर्वी दोघांना अटक केली होती. चौकशीत त्यांनी या दोघांची नावे समोर आली होती.

प्रकाश देवीलाल जोशी (वय ४८) व मोहन मथुरादत्त जोशी (वय ४८, दोघे सध्या रा. अहमदनगर, मूळ रा. नैनीताल, उत्तराखंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणात सूरज अभय गुगळे (रा, शिरूर), आदित्य दिलीप ठाकूर (वय २५,रा. आदिनाथनगर, ता. शिरूर) यांना अटक करण्यात आली होती.

शिरूर भागात आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोबाइलद्वारे सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. ३१ ऑक्टोबर रोजी तेथे छापा टाकून पोलिसांनी गुगळे व ठाकूर यांना अटक केली होती.

त्यांच्याकडे चौकशी सुरू असताना त्यांनी अहमदनगर, पुणे जिल्ह्यात क्रिकेट सामन्यांवर मोठ्या प्रमाणावर सट्टा घेतला जात असून प्रकाश जोशी, मोहन जोशी मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पसार झालेल्या सट्टेबाजांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पृथ्वीराज ताटे, अमोल गोरे, दत्तात्रय गिरमकर, राजेंद्र पुणेकर, महेश गायकवाड यांनी जोशी यांना नगर शहरात पकडले. दोघांना शिरूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.