Pune : एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या बडतर्फ पोलिस दाम्पत्याचा तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप; माजी खा. राठोडांचे धुमाळ प्रकरणावर सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पोलीस दाम्पत्याला केवळ आकसा पोटी रश्मी शुक्ला यांनी बडतर्फ केले आहे. तर त्यांच्या विनाकारण त्रासामुळेच बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, रश्मी शुक्ला यास जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आज पोलिस दलातून बडतर्फ केलेल्या राठोड दाम्पत्याने केली आहे. तसेच, मी एव्हरेस्ट शिखर सर केले असून, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. नेपाळ सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यांनी दिलेले ते पत्र आजही आमच्याकडे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.  पुण्यातील पत्रकार भवनमध्ये आज (गुरूवार-दि. 1 एप्रिल 2021) माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या उपस्थितीत राठोड दाम्पत्याने पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी ऍड. रमेश राठोड, युवराज आडे, संतोष पवार, राजाभाऊ चव्हाण उपस्थितीत होते.

दिनेश राठोड व तारकेश्वरी राठोड-भालेराव अशी बडतर्फ करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. राठोड दाम्पत्य 2006 मध्ये पोलीस दलात भरती झाले. ते पोलीस मुख्यालयात नेमणुकीस होते. त्यावेळी 20 एप्रिल 2017 पासून हे दाम्पत्य एव्हरेस्ट सर करण्यासाठी सुट्टीवर गेले होते. त्यानंतर 7 जूनला त्यांनी एव्हरेस्ट सर केल्याचे जाहीर केले. तर एव्हरेस्ट सर केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. ही बाब पुणे पोलीस दलात आल्यानंतर आनंद साजरा करत त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.

मात्र, यानंतर गिर्यारोहक अंजली कुलकर्णी व त्यांचे पती आणि इतरांनी त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केली नसल्याची तक्रार पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला याच्याकडे केली होती. त्यानुसार या दोघांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. तर विभागीय चौकशीत त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले होते. 2017 ला त्यांना बडतर्फ केले होते.

यानंतर देखील राठोड दाम्पत्याने आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले होते. आता त्यांनी आज पत्रकार परिषद घेत सर्व हकीकत मांडली आहे. यावेळी त्यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केवळ कोणाच्या तरी सांगण्यावरून चौकशी न करता आकसापोटी आमच्यावर कारवाई केली. खर तर कारवाई करण्याचा किंवा आम्ही एव्हरेस्ट शिखर सर केले की नाही, हे ठरविण्याचा अधिकार त्यांना नव्हता. पण त्यांनी हे प्रकरण इतके का लांबवले असा प्रश्न आहे. नेपाळ सरकराने आम्हाला प्रमाणपत्र दिले आहे. शिखर सर करण्यासाठी त्यांचे लोकसोबत होते. आमचे प्रमाणपत्र माघारी घेतले असे सांगितले गेले. पण ते घेतले गेलेले नाही. ते आमच्याकडेच आहे. आम्ही याबाबत नेपाळ सरकारला जाऊन भेटलो. त्यांना हकीकत सांगितली. त्यावेळी त्यांनी आम्हाला यात पडायचे नाही. आम्ही प्रमाणपत्र दिले असून, तुम्ही शिखर सर केले आहे, असे सांगितले.

हे सर्व प्रकरण सुरू असताना आम्हाला शासकीय निवस्थान सोडण्यासाठी दबाव आणला आणि ते घर खाली करण्यास भाग पाडले. या सर्व त्रासातून पत्नीला भयंकर त्रास झाला. ती गर्भवती होती. पण या त्रासामुळे बाळ मयत झाले. याला सर्वस्वी जबाबदार या रश्मी शुक्ला आहेत. आम्ही त्यावेळी देखील पत्रकार परिषद घेतली होती. पण, आम्हाला नंतर त्रास दिला आणि आता पत्रकार परिषद न घेण्यास सांगितले, असे यावेळी राठोड यांनी सांगितले. रश्मी शुक्ला व तक्रार करणारी अंजली कुलकर्णी, तिचे पती व या कटात सहभागी असणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

पोलिस निरीक्षक धनंजय धुमाळ प्रकरण? – माजी खा. हरिभाऊ राठोड
रश्मी शुक्ला भ्रष्ट अधिकारी आहेत. त्या पोलिस निरीक्षक धनंजय धुमाळ यांच्या माध्यमातून खंडणी गोळा करायच्या. 25 लाख रुपये खंडणीचे प्रकरण समोर आल्यानंतर मीडियाला शांत करण्यासाठी धुमाळला सस्पेंड केले. पण, प्रत्यक्षात स्पसेंड न करता धुमाळांना व्हीआरएस घ्यायला लावून सुखरूप सोडले, अशी माहिती आता आरटीआयमधून समोर आली आहे. तर धुमाळ हे पुणे शहर पोलीस दलात नसताना ते जमिनीचे प्रकरण दिले. या सर्व प्रकरणांची देखील चौकशी करावी, अशी मागणी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. तर सर्व प्रकरण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहीत होते. मात्र रश्मी शुक्ला व त्यांचे चांगले संबंध होते, त्यामुळे यावर काहीच कारवाई झाली नाही, असेही राठोड म्हणाले.