Pune : विकेंडच्या लॉकडाऊनंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   विकेंडच्या पहिल्या लॉकडाऊननंतर सकाळी आठ वाजल्यापासून दुकाने खुली झाली. मात्र, ग्राहकांअभावी दुकानदारांची काहीशी निराशा झाली. दुपारनंतर अनेक दुकानदारांनी शटर अर्ध्यावर आणून ठेवले होते. मात्र, दुपारनंतर गुढी पाडव्याची खरेदी करण्यासाठी सायंकाळी नागरिकांनी गर्दी केली होती. हडपसर मुख्य बाजारपेठेत खरेदीदारांमध्ये कमालीची नाराजी दिसत होती. गुढी पाडव्यानिमित्त स्वीटहोममध्ये तर रस्त्यावर गुढी उभारण्यासाठी काठी घेण्यासाठी नागरिक दिसत होते. दोन दिवसांच्या बंदनंतर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होईल, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, तो फेल ठरल्याचे कॅम्प परिसरातील दुकानदारांनी सांगितले.

उन्हाचा कडाका आणि कोरोना वाढती भीती असली तरी हडपसरच्या मुख्य बाजारपेठेसह रामटेकडी, मुंढवा, केशवनगर, मांजरी, फुरसुंगी, हवेली तालुक्यातील अनेक गावांसह, जुना पुलगेट, इस्ट स्ट्रीट, महात्मा गांधी चौक, नाना चुडामन चौक, भवानी पेठ, छत्रपती शिवाजी मार्केट परिसरामध्ये लस्सी, ताक, समोसे, वडापाव, हातगाड्यावरील चमचमीत पदार्थ खाणाऱ्यांची गर्दी झाली होती. डोक्यावर टोली, गॉगल, मास्क घालून नागरिक दुचाकीवरून किरणा मालाच्या दुकानाबरोबर स्वीट होम, बेकरी आदी ठिकाणी खरेदीसाठी धावाधाव करताना दिसत होते.

लॉकडाऊन कधी पडेल याची भीती असल्याने पुढील महिन्याचा किराणाही अनेकांनी आज भरून ठेवल्याचे सामान्य नागरिकांनी सांगितले. गुढी पाडव्यानिमित्त खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर येतील अशी आशा दुकानदारांना होती. मात्र, कपड्याच्या दुकानात कुठेही गर्दी दिसत नव्हती. तर सराफा बाजार सोमवारी बंद होते. तसेच स्टेशनरी-कटलरी दुकानांमध्ये काही ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली. पायताणाच्या आणि फर्निचरच्या दुकानात एकही ग्राहक फिरकला नसल्याने अनेक दुकानदारांनी सांगितले. चप्पलचे दुकानदार म्हणाले की, स्वच्छता करण्यासाठी दुकान उघडले आहे. ग्राहक फिरकले नाही. मात्र, दुकान उघडले नसते, उदरांनी आमच्या दुकानाला कामयचे लॉकडाऊन करायला लावले असते म्हणून दुकान उघडून स्वच्छता करावी लागत आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन केल्यानंतर दुकान बंद ठेवण्यापेक्षा आम्हाला उंदरांची भीती जास्त आहे. मागिल वर्षभर कोरोनामुळे हलाखीमध्ये गेला. दिवाळीपासून कर्जाऊ, उसनवारीने पैसे घेऊन कसे तरी दुकान सुरू केले होते. तर पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने लॉकडाऊन टांगती तलवार कायमची राहिली आहे. आता आम्ही जगायचे तरी कसे असा प्रतिप्रश्न अनेक दुकानदारांनी उपस्थित केला. अनेक दुकानदारांनी कामगारांना बोलावले नाही, स्वतःच दुकान उघडलून स्वच्छता केल्याचे सांगितले.

कॅम्पमधील छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये फळविक्रेत्यांनी भाऊगर्दी केली होती. मात्र, ग्राहकांअभावी त्यांनाही फळावर बसलेल्या माशा हाकलण्याची ड्युटी लागल्याची चर्चा आपपासत सुरू असल्याचे दिसले. गुढी पाडवा एक दिवसावर असूनही ग्राहकांअभावी बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक वर्षांनंतर अशी परिस्थिती आल्याचे जुन्या पोक्त मंडळींनी सांगितले.