Pune News : …तर पुण्याचे नामांतर ‘जिजापूर’ करा : संभाजी ब्रिगेडची मागणी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  सध्या औरंगाबादचे संभाजीनगर असं नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन सत्तेवर असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील मतभेद आहेत. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडनेही नामांतरासंदर्भातच पुन्हा जुनी मागणी नव्याने पुढे आणली आहे.

दरम्यान, संभाजी ब्रिगेडने पुणे शहराचे नामांतर करुन पुण्याला ‘जिजापूर’ असे नाव द्या, अशी मागणी केली आहे. याबाबत बोलताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे की, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायला वेळ लागत असेल तर राष्ट्रमाता जिजाऊंनी उध्दवस्त झालेल्या पुणेला वसवलं. पुण्याला जिजाऊंचे नाव देऊन पुण्याचे ‘जिजापूर’ असे नामांतर करून टाका. पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे.

शिवनेरीपासून लाल महालपर्यंत आणि पुरंदर पासून तोरणा, राजगड, सिंहगड, विसापूर, लोहगड, राजमाची, विचित्रगड ते स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्वर पर्यंत सह्याद्री ओरडून ओरडून कर्तुत्व आणि पराक्रमाचा इतिहास सांगत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आपला पुणे जिल्हा आहे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक आहे. पुण्यात राष्ट्रमाता जिजाऊंनी बाल शिवबा’ला घेऊन सोन्याचा नांगर चालून पुणे वसवलं, त्या पुण्याचं आज सोनं झालेले आहे. घडलं ते रयतेच स्वराज्य.

थोरात साहेब, टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कळणार आणि पचणार नाही, नामांतराचे राजकारण करू नका. इतिहासातील प्रतिकांचा आदर करायला शिका. आमचा वारसा आम्हाला अजून गौरवपुर्वक चालवू द्या. म्हणून पुण्याला ‘जिजापूर’ हे नाव द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केली आहे.