Pune : हडपसरमध्ये कडक Lockdown, पोलिसांचा खडा पहारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने विकेंडला शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी केली असून, त्याला दुकानदार आणि व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाल्याचे हडपसर आणि परिसरामध्ये दिसून आले. रस्त्यावर तुरळक वाहनांची वर्दळ वगळता सर्वत्र कडक बंद पाहायला मिळाला. हडपसर मार्केट पूर्णपणे बंद होते, तर गांधी चौकामध्ये वाहतूक पोलीस आणि खाकी वर्दीतील पोलीस वगळता रस्त्यावर नागरिक नव्हते.

हडपसर, ससाणेनगर, मगरपट्टा, रामटेकडी, वानवडी, मांजरी, साडेसतरानळी, फुरसुंगी, मुंढवा, केशवनगर, शेवाळेवाडी आदी परिसरातील सर्व दुकाने कडकडीत बंद होती. त्यामुळे रस्त्यावर अत्यावश्यक सेवेतील तुरळक वाहने धावत होती.

पोलिसांचा खडा पहारा असल्यामुळे रस्त्यावर नागरिक आणि वाहनांची वर्दळ नव्हती. अत्यावश्यक सेवेतील मेडिकल आणि हॉस्पिटलची सेवा सुरळीत सुरू होती. रुग्णांच्या नातेवाईकांची औषधे मिळवित हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी धावपळ सुरू होती. हॉस्पिटलमध्ये रुग्णांबरोबर नातेवाईकांची मोठी गर्दी दिसत होती. अनेकजण भ्रमणध्वनीवरून उपचारासाठी आणि बेड, व्हेंटिलेटर, अतिदक्षता विभागात रुग्णांना दाखल करण्यासाठी चौकशी करीत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भयावह वातावरण पसरले आहे. वैद्यकीय यंत्रणा उपचारासाठी २४ बाय ७ कार्यरत आहे.

कोरोनाच्या भीतीने नागरिक सैरभैर झाले आहे. त्यात आता दोन दिवस कडक लॉकडाऊन आहे. कोरोनाबाधितांना उपचारासाठी बेड मिळत नसल्याने नातेवाईकांची पुरे वाट लागली आहे. त्यातच दोन दिवसांचा कडक लॉकडाऊन असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसत आहे.

पुण्याच्या पूर्व भागात हडपसरमध्ये कोरोनाचा हॉट्स्पॉट होत आहे. नागरिक दक्षता घेत आहेत. मात्र, रुग्ण आणि नातेवाईकांवर उपचारासाठी प्रचंड तणाव निर्माण जाला आहे. कारण उपाचारासाठी रुग्णालयामध्ये साध्या बेडपासून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभाग तयार करण्याची हडपसरमध्ये वेळ आली आहे.

आता रुग्णांना वेळेत उपचार निकडीची गरज आहे. महापालिका प्रशासनाने रुग्णांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी तातडीची यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी अनेक संस्था, संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. कोविड सेंटर सुरू करून नागरिकांना उपचाराची सुविधा अत्यंत निगडीची गरज आहे.