Pune : आपलं गावं आपली जबाबदारी सांभाळा – उद्योजक दशरथ शितोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. रोजंदारीवरील मजुरांची बिकट अवस्था झाली आहे. उसनवारी आणि उधारी मिळेनाशी झाली आहे, अशा परिस्थितीमध्ये सामाजिक जबाबदारीतून ज्या मातीत जन्मलो, त्या मातीशी माझे ऋणानुबंध कायम आहेत, या भावनेतून एक पाऊल पुढे टाकत 300 कुटुंबांना छोटीशी मदत दिली आहे. आपलं गाव, आपली जबाबदारी सांभाळा, मास्क वापरा, गाव वाचवा, असा संदेश कोरेगाव मूळचे उद्योजक दशरथ शितोळे यांनी दिला.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील 300 कुटुंबांना साखर, शेंगदाणा, गोडेतेल, तांदूळ, आटा, तूरडाळ, साखर, चहा पावडर, हरभरा, मटकी, बेसन पीठ, कांदा मसाला, संतूर साबण, मीठ, व्हील साबण, कोलगेट, हळद अशा साहित्याचे कीट देण्यात आले. याप्रसंगी सुरेश भोसले, ताराचंद कोलते, नारायण शिंदे, लोकेश कानकाटे, मंगेश कानकाटे, राजेंद्र शिंदे, रामदास काकडे, सागर मेमाने, योगेश गायकवाड, सुदर्शन कानकाटे, मुकिंदा काकडे उपस्थित होते.

उद्योजक शितोळे म्हणाले की, कोणाची काही अडचण असेल तर सांगा, ती सोडविण्यासाठी जरूर प्रयत्न केला जाईल. कोरोना महामारीमध्ये दानशूरांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून गरजूंना मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे, हीच समाजसेवेची खरी संधी आहे. पैसा, संपत्ती, मालमत्ता यापेक्षा माणूस म्हणून मदत करण्याची आज आवश्यकता आहे. कोरोना महामारीमुळे कोणी उपाशीपोटी राहत असेल, तर त्यांच्या मदतीसाठी प्रत्येक गावातील पुढाऱ्यांनी पुढे आले पाहिजे. त्यांनी ठरवले तर गावातील गोरगरीब उपाशी राहणार नाही, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या वेळी गावपुढारी धावून येतात, त्या पद्धतीने आता गरजूंच्या मदतीसाठी पुढे येणे क्रमप्राप्त आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उद्योजक शितोळे म्हणाले की, लसीकरण घेण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. नोंदणीकरणामुळे ग्रामीण भागातील नागरिकांऐवजी शहरातील नागरिकांची नावे येत आहेत. त्यामुळे दानशूर मंडळी लस विकत घेऊन गरिब नागरिकांना देण्याची तयारी दर्शवित आहे, त्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, असेही त्यांनी आवाहन केले. उद्योजक दशरथ ऊर्फ बापूसाहेब शितोळे यांचे कौतुक करून ग्रामस्थांनी आभार मानले.