Pune : चोरट्यांनी चक्क ‘पत्रपेटी’च पळवली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   शहरात घरफोड्या सुरू आहेत अन या घरफोड्यात टीव्ही म्हणा किंवा इतर साहित्य चोरीला गेल्याचेही पाहिले आहे पण, चतु:शृंगी परिसरात चोरट्यांनी चक्क पोस्टाची पत्रपेटी चोरुन नेली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी डोक्याला हात लावला अन नागरिकांनी पत्रपेटीत काय बॉवा अशी प्रतिक्रिया दिली आहे.

याप्रकरणी नाथू बधे (वय 55) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवाजीनगर येथील पोस्ट ऑफिसमध्ये शिपाई म्हणून काम करतात. ते शहरात लावलेल्या पत्रपेटीतून पत्र काढून घेतात आणि त्यानंतर पत्रे नोंद ते वाटप अशी पुढील कामे करतात.

सेनापती बापट रोडवर सहारा हॉटेलसमोरची पोस्टाची पत्रपेटी आहे. फिर्यादी यांनी 1 मेला पेटीतील पत्रे काढून नेले व पुन्हा पत्रपेटी कुलूपबंद करून ठेवली. दोन दिवसांनी ते पुन्हा पत्र काढण्यासाठी गेले असताना त्यांना ही पत्रपेटी जाग्यावर दिसली नाही. भिंतीला तारेने अडकवलेली पत्रपेटी कुणीतरी काढून नेल्याचे लक्षात आल्यानंतर बधे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.