Pune : शहरातील मंदिरामधील दान पेटया चोरी करणार्‍या तिघांना फरासखाना विभागाच्या विशेष पथकाकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यवस्तीमधील मंदिरातील दान पेट्या चोरी प्रकरणाचा फरासखाना विभागाच्या विशेष पथकाने छडा लावत चारही गुन्हे उघडकीस आणलेत आहेत. यात तिघांना अटक करत 2 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. गेल्या काही दिवसात मंदिरात चोरीच्या घटना वाढल्या होत्या. पण, या विशेष पथकाने चोरट्यांना पकडत याला ब्रेक लावला आहे.

रमीज इकबाल हकीम/खान (वय 20, काशेवाडी), अनिल मिधा पटेल (वय 28, रा. श्रीनाथ हॉटेल, बुधवार पेठ),आणि विनायक बंडू कराळे (वय 20, रा. काशेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

गेल्या काही दिवसात मध्यवस्तीमधील मंदिरातून दानपेटी व इतर ऐवज चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. या प्रकारामुळे पुणेकरांत तीव्र नाराजी पसरली होती. यामुळे फरासखाना विभागाचे सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांनी विशेष पथकाची स्थापना केली. तसेच, या गुन्ह्याचा माग काढण्यास सुरुवात केली. मार्गदर्शन आणि सूचना देऊन परिसरातील सीसीटीव्ही व खबरे यांच्या माहितीचे जोरावर चारही गुन्ह्याचा छडा लावला आहे.

नाकोडा भैरवजैन मंदिरातून दानपेटी व पैसे असा दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. तर अकरा मारुती कोपरा गणपती येथूनही दानपेटी व पैसे चोरीला गेले होते. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा छडा लावत रमीज हकीम/खान याला पकडले त्याच्याकडून 1 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज व दुचाकी जप्त केली आहे. तर फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत फडके हौद येथे म्हसोबा मंदीरातील चोरी प्रकरणात अनिल पटेल याला पकडले आहे. त्याने कुलूप तोडून 900 रुपये चोरून नेले होते.

त्यानंतर शीतळादेवी मंदिराचे कुलूप तोडून चांदीचे दोन मुकुट चोरीला गेले होते. याचोरी प्रकरणात पोलिसांनी विनायक कराळे याला पकडले आहे. त्याच्याकडून दोन चांदीचे 8 हजार रुपयांचे मुकुट जप्त केले आहेत. मंदिरात झालेल्या चारही गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावल्याने नागरिकांनी सुकतेचा श्वास सोडला आहे.

ही कारवाई परिमंडळ एकच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहाय्यक निरीक्षक बोबडे, फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे, समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे व त्यांच्या पथकाने केली आहे.