पुण्यात दुकाने दुपारी साडेबारापर्यंत बंद राहणार, व्यापारी महासंघाचा बंदला पाठिंबा

पुणे : शेतकर्‍यांनी पुकारलेल्या भारत बंदला पुण्यातील व्यापार्‍यांनी पाठिंबा दर्शविला आहे. शहरातील व्यापारी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवणार आहे. कोरोना काळात व्यवसायाचे आधीच खूप मोठे नुकसान झाले असल्याने बंदला पाठिंबा असला तरी दुकाने सुरु ठेवण्यात येतील. मोर्चामध्ये व्यापारी सहभागी होतील, अशी भूमिका व्यापारी महासंघाने अगोदर घेतली होती.

त्यानंतर रात्री पुण्यातील सर्व दुकाने साडेबारा वाजेपर्यंत म्हणजे भारत मोर्चा संपेपर्यंत बंद राहतील, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली आहे. शहरात साधारण सकाळी १० वाजता दुकाने उघडतात. ती आणखी अडीच तास उशिरा उघडणार आहे.

आज सकाळी दुध व अन्य साहित्य विक्री करणारी किराणा दुकाने नेहमीप्रमाणे सुरु होती. महात्मा फुले मंडईत सकाळी काही प्रमाणात मालाची आवक झाली. व्यापार्‍यांनी आपले गाळे सुरु केले. मात्र, ग्राहकांची संख्या रोडावली आहे. बंद असल्याने ग्राहक बाजारपेठेकडे वळलेले दिसत नाही.

पुण्यातील रस्त्यावरील वाहतूकही सकाळी कमी दिसत होती. बस, एस टी गाड्या या नेहमीप्रमाणे धावताना दिसत होत्या. रस्त्यावर रिक्षांचे प्रमाण कमी दिसत होते.

पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे. मोर्चा काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. एका ठिकाणी थांबून आंदोलकांना आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे. सकाळी ११ ते २ या दरम्यान ठरवून दिलेल्या जागेवर आंदोलन करण्यास, निवेदन देण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्कसह सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.