एकाच वेळी 2 खून झाल्यानं पुणे हादरलं ! हडपसरमध्ये चिकन विक्रेत्याचा तर कोथरूडमध्ये गॅरेज चालकाला सपासप वार करून संपवलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी दोन खुनाच्या घटना घडल्या असून, दोन्ही खून सपासप वारकरून घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून दोन्ही खुनाचे आरोपी पसार झाले आहेत. हडपसर आणि कोथरूड भागात या घटना घडल्या आहेत.

आकाश लक्ष्मण भोसले (वय 24, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा चिकण विक्रेता आहे. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर अज्ञातांनी तीक्ष्ण हत्याराने सपासप वारकरून निर्घृण खून केला. त्यानंतर आरोपी पसार झाले. याची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

तर दुसरा खून काही वेळापूर्वी कोथरूड भागात घडला आहे. एका गॅरेज चालकाच्या डोक्यात सपासप वार करण्यात आले आहेत. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी कोथरूड पोलिसांनी धाव घेतली आहे. गॅरेज चालकाचे मारेकरी पसार झाले असून,पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अद्याप त्याबाबत पोलिसांनी काही माहिती जाहीर केलेली नाही. मात्र त्याचा मृत्यू झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दोन्ही खून पूर्ववैमनस्यातून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे पुण्यातील खुनाचे सत्र थांबत नसल्याचे देखील दिसत आहे. दोन्ही खुणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.