Pune : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसाचा दिलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागिल दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आज दुपारी पावसाने हजेरी लावल्यामुळे दिलासा मिळाला. आज दुपारी साडेचारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. अर्धा तास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रस्त्यावरून पाणी वाहू लागताच पावसाने विश्रांती घेतली. मात्र, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा दिला.

हडपसर, फुरसुंगी, रामटेकडी, मुंढवा, केशवनगर, मांजरी, शेवाळेवाडी, लोणी काळभोर, उरुळी कांचन, फुरसुंगी, उरुळी देवाची आदी परिसरात पावसाने हजेरी लावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकएंडला शनिवार-रविवार दोन दिवस कडक लॉकडाऊन केल्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती. फेरीवाले, हातगाडीवाले, भाजीविक्रेत्यांनी अनुपस्थिती आज सर्वांनाच जाणवली. अचानक आलेल्या पावसामुळे रस्ता ओला झाल्यामुळे दुचाकीस्वारांनी सावध पवित्रा घेतल्यामुळे अपघात टळले.

राज्यातील मराठवाडा, कोकण आणि विदर्भात गारपीटीसह जोरदार पावसाची शक्यता होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुणे शहर आणि उपनगर परिसरात रात्री पुन्हा पाऊस होण्याची चिन्हे दिसत आहेत.