Pune : शहरात विनाकारण रस्त्याने फिरणाऱ्यांचे वाहन व वाहन परवाना जप्त केला जाणार; सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात कोरोनाची साखळी तोडण्यास प्रशासन युद्ध पातळीवर नियोजन करत असताना काहीजण नियमांचे उल्लंघन करत आहेत. आता अशा लोकांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार असून, वाहन व वाहन परवाना जप्तीची कारवाई केली जाणार आहे. तशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत, असे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले आहे. यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, सूचनांचे पालन करावे आणि सोशल डिस्टसिंग पाळावे, असे आवाहन सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

शहरात कोरोना झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू केली आहे. पण काहीजण विनाकारण फिरत आहेत. तर अत्यावश्यक सेवा घेण्याच्या नावाने फिरताना दिसून आले आहे. पोलीस गेली दोन दिवस प्रेमाने नागरिकांना आवाहन करत आहेत. पण नागरिक त्याला म्हणावा तसा प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे आता पोलिसांनी आजपासून आता कडक कारवाईचे धोरण स्वीकारले आहे. त्याशिवाय विनाकारण फिरणाऱ्याना चाप लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याचवेळी अत्यावश्यक सेवा किंवा खरच गरजेसाठी बाहेर पडलेल्यांना त्रास होणार असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विनाकारण न फिरण्याचे आवाहन केले आहे.

दुसरीकडे गेल्या वर्षी कोरोना काळात एसपीओची (विशेष पोलीस अधिकारी) मदत घेण्यात आली होती. आता यावेळी देखील त्यांची मदत घेतली जाणार आहे. नाकाबंदी तसेच बंदोबस्त आणि पेट्रोलिंगसाठी हे विशेष पोलीस मदत करणार आहेत. अडीच हजाराहून अधिक हे अधिकारी आहेत.

शहरात पोलीस बंदोबस्त व पुढील कामकाज याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आढावा घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन नियमांचे पालन आणि अंमलबजावणी करण्याचे सांगण्यात आले आहे.